करदळ ही नेहमीच्या कर्दळीपेक्षा वेगळी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ‘एन्सीस्ट्रोक्लॅडस हायनीअनस असे आहे. अन्सिस्टीन म्हणजे हूक आणि क्लॅडोस म्हणजे फांद्या अर्थात हूक असलेल्या फांद्यांचा वृक्ष.

या करदळीचा लहान वृक्ष किंवा पसरणारे लहान झुडूप असते. त्याला असलेल्या काष्ठ तंतूंचा आधार घेऊन करदळ वाढते. मूळ फांद्यांचे रूपांतर काष्ठतंतूत होते. पाने व फुले येणाऱ्या फांद्या बेचक्यात असतात. करदळ साधारणपणे २-३ मीटर उंच वाढते. १० ते २५ सेमी लांब अशी एकांतरित पाने असतात. सदाहरित पानांवर ठळक शिरा असतात. फुलं पांढरी, लहान तुऱ्यात उगवतात व लवकर गळून पडतात. फुले लहान, गोल पाच पंखसदृश पाकळ्या असलेली, फुलांचा हंगाम मार्च – एप्रिलमध्ये असतो.

हा दुर्मीळ वृक्ष महाराष्ट्रात खंडाळा, माथेरान, फणसाडचे अभयारण्य, अंबोली घाट या ठिकाणी नैसर्गिकरीत्या वाढताना आढळतो. केरळमध्ये तिला मल्याळम भाषेत ‘मोडिरावल्ली’ म्हणतात. या करदळीच्या एका जातीमध्ये ‘एड्स’ हा रोग बरा करण्याची क्षमता आहे. म्हणूनच सर्वाना करदळीच्या प्रजातींमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. मोठय़ा प्रमाणात मागणी वाढल्यामुळे हा दुर्मीळ वृक्ष नाहीसा होण्याच्या मार्गावर जाण्याची भीती आहे.