हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित आहे. यालाच ‘कंठरुद्र उपनिषद’ असेही म्हणले जाते. ह्या उपनिषदात देवतांनी ब्रह्मविद्येची जिज्ञासा केल्यावर भगवान प्रजापतींनी संन्यास आश्रमात प्रवेश करण्याच्या विधीसोबतच आत्मतत्त्वाचे विवेचन केलेले आहे. पहिल्या तीन कंडिकांमध्ये संन्यासग्रहणाचा विधी दिलेला आहे. चार ते अकरा या कंडिकांमध्ये संन्यासानंतरच्या विविध नियमांचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर ब्रह्माचे आणि मायेचे वर्णन करून तन्मात्रांच्या आणि ब्रह्मांडाच्या रचनेचा उल्लेख केलेला आहे. पंच-आत्मा, पंचकोश यांचे मर्म समजावून देऊन परमात्म तत्त्वासच ईश्वर, जीव, प्रमाता, प्रमाण, प्रमेय आणि फळ इत्यादींच्या रूपात स्थापित केलेले आहे. शेवटी या साऱ्या कथोपकथनास वेदांताचे सार म्हणलेले आहे.