कंबोडियाचा इतिहास

इतिहास

कंबोडियाचा इतिहास चार हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. कंबोडिया पूर्वेकडच्या अशा देशांत मोडतो जेथे प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. कंबोडियाच्या प्राचीन इतिहासात तेथे अतिशय सुसंस्कृत हिंदू संस्कृती नांदत होती असे दिसून येते.

इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ला युद्धद करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली व कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हणले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिद्ध मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिले आहे. :

कुलासीद भूजगेन्द्रकन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम् I
कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्यार्थ पत्नीत्वमनायियापि II

चिनी इतिहासकारांनी ह्या कौडिण्यबद्दल बरेच लिहून ठेवले आहे. त्यामुळे ही केवळ काल्पनिक कथा राहत नाही.
कौडिण्य ने स्थापन केलेल्या राज्याचे चिनी नाव आहे, ‘फुनान साम्राज्य’. त्याचे हिंदू नाव उपलब्ध नाही. त्यामुळे जागतिक इतिहासात ते ‘फुनान साम्राज्य’ या नावानेच ओळखले जाते. साधारण इसवी सन ६१३ पर्यंत हे फुनान साम्राज्य होते असे उल्लेख सापडले आहेत. या काळात, भारतातील अनेक युवक या साम्राज्यात स्थायिक झाले आणि त्यांनी स्थानिक नाग युवतींशी विवाह केले, अश्या नोंदी सापडल्या आहेत. याच काळात, या भारतीयांनी आपले शेतीतील ज्ञान वापरून या साम्राज्यात कालवे खोदले आणि चांगल्या शेतीने देशात समृद्धी आणली. हे खोदलेले कालवे आजही कंबोडियाच्या उपग्रह-चित्रात स्पष्ट दिसतात.
साधारण सातव्या शतकाच्या सुरुवातीला या फुनान राजवंशात अराजक निर्माण झाल्याने ‘कंबू’ नावाच्या, भारतातून तिथे गेलेल्या क्षत्रियाने शासनाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून हा देश ‘कंबुज’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे याचेच ‘कंबोडिया’ झाले. या कंबुज वंशाने तीनशे/साडेतीनशे वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले. यांच्याच काळात भववर्मन, महेंद्रवर्मन यांच्या सारखे महापराक्रमी राजे निर्माण झाले.
पुढे नवव्या शतकात, जयवर्मन (दुसरा) याने ख्मेर साम्राज्याची स्थापना केली. त्याचा नातू यशवर्मन ने यशोधरपूर नावाची नवीन राजधानी स्थापन केली. याच वंशातील सम्राट सूर्यवर्मन याने जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर, ‘अंगकोर वाट’ बांधले.
म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते पुढे हजार / बाराशे वर्ष, या विशाल साम्राज्यात हिंदू संस्कृती वैभवाने नांदली. भारतापासून दूर, ह्या देशात सहाशे / सातशे वर्ष संस्कृत ही राजभाषा म्हणून मानाने मिरवली.

सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास

संपादन

इसवी सनापूर्वी सुमारे २,००० वर्षांच्या दरम्यान मुख्यत्वे भातशेतीची लागवड करण्यासाठी सुपीक जमीनींचा शोध सुरू झाला. यातूनच भारताच्या मुख्य भूमीवरून हळूहळू पूर्वेकडे स्थलांतर होऊ लागले. सुरुवातीच्या काळात स्थलांतरितांनी स्वतःची स्वतंत्र खेडी स्थापन करण्यास प्रारंभ केला. याच बरोबर भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापारामुळे हा भूभाग हळूहळू माणसांनी आणि भारतीय संस्कृतीने व्यापला गेला. यालाच या भूभागाचे हिंदुत्वीकरण (इंडियनायझेशन) म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने हिंदुत्वीकरणाचा काळ इसवी सना पूर्वी ५०० (२००?) वर्षे मानला जातो. सर्वांत जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉॅंग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. भारत-चीन यांच्या व्यापारामुळे वृद्धिंगत होणाऱ्या या संस्कृतीत हळू हळू हिंदू ब्राह्मण, बौद्ध भिक्षू, अन्य विद्वान, कारागीर, कलावंत यांची ये जा ही सुरू झाली.

आख्यायिका

संपादन

कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदयाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे—कंभोज देशाचा कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा(Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले.

या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसलेली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक होते पण पुढे जाऊन चेन्लाने फुनानवर स्वारी करून ते राज्य आपल्या अंकित केले.

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: