धिंगरी अळिंबी

(ऑईस्‍टर मश्रूम या पानावरून पुनर्निर्देशित)

धिंगरी अळिंबी किंवा ऑईस्टर मशरूम (इंग्रजी:Pleurotus ostreatus) ही एक प्रकारची अळिंबी असून अगॅरिकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी असलेली बुरशीच्या प्रजातीची वनस्पती होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळांस "अळिंबी" किंवा "भूछत्र" असे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये ऑईस्‍टर मशरूम या नावाने ओळखले जाते []. अळिंबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कमी भांडवलात व आहारात उपयुक्त अशी धिंगरी अळिंबी उत्पादन करतात.[] या अळिंबीला "शिंपला” किवा “पावसाळी छत्री” अशा नावांने द्धा ओळखले जाते.

Chiltan Mashroom - panoramio
Mashroom6

धिंगरी अळिंबीच्या जाती व वैशिष्ट्ये

संपादन

धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या विविध जाती खालीलप्रमाणे आहेत -

  1. प्लुरोटस साजोर काजू
  2. प्लुरोटस इओस
  3. प्लुरोटस फ्लोरिडा
  4. प्लुरोटस ऑस्ट्रिटस
  5. प्लुरोटस फ्लॅबिलॅटस
  6. प्लुरोटस सीट्रिनोपिलीटस

धिंगरी अळिंबी लागवडीची सुधारित पद्धत

संपादन

१] लागवडीसाठी जागेची निवड

संपादन

अळिंबीच्या लागवडीसाठी उन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण होईल असा निवाऱ्याची गरज आहे म्हणजेच एक बंद जागा जसे की ,पक्के अथवा कच्चे बांधकाम असलेली खोली अथवा शेड, आच्छादित असलेली झोपडी असावी. या जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश नसावा व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी लागते.

२] लागवडीचे माध्यम

संपादन

धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी पिष्ठमय पदार्थ अधिक असणारी घटकांची आवश्यकता असते.यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भाताचा पेंडा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कपाशी, सोयाबीन, तुरीच्या काड्या, उसाचे पाचट, नारळकेळी यांची पाने, भुईमुगाच्या शेंगाची टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो.

३] लागवडीचे वातावरण

संपादन

धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० अंश सेल्सियस आणि आर्द्रता ६५ ते ९०% असणे आवश्यक असते. यासाठी लागवडीच्या ठिकाणी तापमान व आर्द्रता यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर, हवेत व चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. सर्वसाधारण २५ अंश सेल्सियस या तापमानास या अळंबीची उत्तम वाढ होते.

४] लागवडीची पद्धत

संपादन

काडाचे २ ते ३ से. मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ६ ते ८ तास बुडून भिजत घालावे. काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.

५] काड निर्जंतुकीकरण

संपादन

भिजवलेल्या काडाचे पोते ८० से.तपमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे. पोते गरम पाण्यातून काढून त्यातील जादा पाणी निथळल्यानंतर तसेच थंड होण्यासाठी मोकळे बांधून ठेवावे. अथवा भिजवलेल्या काडाचे पोते ८० से. तापमानाला वाफेवर १ तास ठेवून काड निर्जंतुकीकरण करावे. काड थंड कण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे.किंवा निर्जंतुकीकरणासाठी ७.५ ग्रॅम बाविस्टिन व १२५ मिली फोॉरर्मेलीन १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये सुकलेले काड पोत्यात भरून १६ ते १८ तास भिजत ठेवावे. द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करण्यासाठी ४ ते ५ तास ठेवावे. नंतर काड ३५ सेमी.x ५५ सेमी आकाराच्या फॉरर्मेलीनने निर्जंतुक केलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये थर पद्धतीने भरावे.

६] पिक निगा

संपादन

योग्य अंतरावर अळंबीचे बेड ठेवावेत .बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. खोलीमध्ये जमिनीवर, भिंतींवर पाणी फवारून तापमान व आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवावी. ३ ते ४ दिवसांत बेडच्या सभोवताली अंकुर दिसू लागतील व पुढील ३ ते ४ दिवसांत त्याची झपाट्याने वाढ होऊन फळे काढणीस तयार होतील.

७] खते व पाणी व्यवस्थापन

संपादन

अळिंबी तंतुमय वाळलेल्या अवशेषांवर वाढते. पिशवीतून बाहेर काढल्यानंतर धिंगरीच्या वाढीच्या काळात बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची फवारणी करावी. वाढीच्या काळात तापमान २० ते ३० से. व आर्द्रता ७० ते ९० % ठेवणे गरजेचे आहे.

८] पिकाचे संरक्षण

संपादन

अळिंबी हे अतिशय नाजूक, नाशिवंत व अल्प मुदतीचे पीक आहे. उगवण्यासाठी वापरलेले काड व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण न झाल्यास तसेच खोलीमधील तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास तत्काळ रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. धिंगरी अळंबीवर पुढील रोग दिसून येतात.

अळिंबीवरील रोग

संपादन

१] ग्रीन मोल्ड

संपादन

हा रोग ट्रायकोडर्मा या बुरशीमुळे होतो . अळंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी पिशवीत काडावर ट्रायकोडर्माची वाढ होऊन काडावर हिरवट काळे डाग पडून काड कुजते .या काडावर अळंबीच्या बुरशीची वाढ होत नाही .फळे येण्याच्या काळात या रोगाचा परिणाम झाल्यावर काळे डाग पडून फळे कुजतात .काडाचे निर्जंतुकीकरण योग्यरित्या न झाल्यास या रोगचा परिणाम होतो व हवापाणी यांद्वारे याचा प्रसार इतर अनेक पिशव्यांमध्ये होऊन नुकसान होते .

उपाय

  1. अळंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे काड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे
  2. हातानं निर्जंतुक औषध लावून पिशव्यांची हाताळणी करावी
  3. या रोगांचा परिणाम दिसून येताच रोगग्रस्त पिशव्या तत्काळ वेगळ्या करव्यात
  4. बेडवर २% तीव्रतेच्या फॉरमॅलीनची फवारणी करावी
  5. कार्बेडेझीम ०.१% किंवा बेनलेट ०.०५ % द्रावणाची एका आठवड्यात अंतराने फवारणी करावी

२] विषारी काळ्या छत्र्या

संपादन

हा रोग कॉप्रिनस या बुरशीपासून होतो .पिशवीत अळंबीच्या बुरशीची वाढ होत असताना कॉप्रिनसची वाढ होते .बेड सोडल्यानंतर अळंबीच्या फळाऐवजी काळ्या रंगाच्या असंख्य छत्र्या काडावर दिसून येतात.

उपाय

  1. अळंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे काड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे.
  2. बेडवर जास्त पाणी मारू नये
  3. बेडवर काळ्या छत्र्या दिसताच हाताने काढून टाकाव्यात .

अळिंबीपासून मिळणारे मूल्यवर्धित पदार्थ

संपादन

अळिंबीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अळंबी पूरक अन्न म्हणून वापरले जाते. ताजी अळिंबी किंवा वाळलेली अळिंबी विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करून विकले तर शेतकऱ्यांस अधिक फायदा होतो.

वाळलेल्या अळिंबीची पावडर तयार करून त्यापासून सूप तयार करता येते. तसेच पावडरचे लहान पॅकिंग करून विक्री करता येते. वाळलेल्या अळिंबीची पावडर तयार करून त्यापासून गोळ्या किंवा वड्या तयार करता येतात. अळिंबीची पावडर तयार करून त्यापासून पापड करता येतात. तसेच अळंबीचे लोणचे, शेवया, सांडगे, चिप्स बनवतात. अळिंबीपासून तत्काळ खाण्यालायक अनेक पदार्थ व पाककृती करता येतात.. अळंबीची भाजी, पुलाव, भजी, समोसा, वडे, सलाड, कबाब, आम्लेट, करी, सॉस, पिझ्झा असे अनेक पदार्थ बनवता येतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "धिंगरी अळिंबी उत्पादन व विक्री व्यवस्थापन". १२ डिसेंबर २०१६. 2016-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय". 2021-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.