शियाळि रामामृत रंगनाथन् (ऑगस्ट १२[], इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२) हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत.[][] भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

प्रारंभिक आयुष्य

संपादन

डॉ.रंगनाथन् यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्‌मयाचे अध्ययन सुरू केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्‍चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त‍ केली.

गणिताची प्राध्यापकी आणि ग्रंथपाल म्हणून कार्य

संपादन

शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.

लंडन विद्यापीठात अभ्यासक्रम

संपादन

ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली.

पुढील कार्य

संपादन

सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन् यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.

आधुनिक काळातील कार्याचे महत्त्व

संपादन

आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन् ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन् ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन् ह्यांनी मांडलेले पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयविज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन् ह्यांचा वाढदिवस भारतात 'ग्रंथपाल दिन' म्हणून साजरा केला जातो.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ http://publications.drdo.gov.in/gsdl/collect/dbit/index/assoc/HASH5351.dir/dbit1205003.pdf [मृत दुवा]
  2. ^ Broughton, Vanda (2006). Essential Classification. London, Facet Publishing. ISBN 978-1-85604-514-8
  3. ^ Indian Statistical Institute Library and Sarada Ranganathan Endowment for Library Science. “S. R. Ranganathan – A Short Biography.” Indian Statistical Institute.

http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-anita-deshpande-about-marathi-article-on-national-librarian-day-4708366-NOR.html