एचएमएस बीगल
एचएमएस (हर मॅजेस्टी शिप) बीगल हे ब्रिटनच्या शाही नौदलाचे एकडोलकाठी गलबत होते. टेम्झ नदीवरील वुल्विच डॉकयार्डमधून ११ मे १८२० रोजी ते जलप्रवासास सोडण्यात आले. बीगल या कुत्र्याच्या जातीवरून नाव देण्यात आलेल्या या गलबताच्या बांधणीस £७,८०३ एवढा खर्च आला होता. १८२० च्या जूनमध्ये राजा चौथा जॉर्ज याच्या राज्याभिषेकाच्या उत्सवात बीगलने भाग घेतला आणि नव्या लंडन ब्रिजखालून जाणारे ते पहिले जहाज ठरले. नंतर निकड नसल्याने बीगल राखीव ताफ्यात राहिले. नंतर सर्वेक्षणासाठी बार्क म्हणून त्याचा स्वीकार करण्यात आला आणि तीन मोहिमांमध्ये बीगलने भाग घेतला. यांपैकी दुसऱ्या मोहिमेत असलेल्या चार्ल्स डार्विन या तरुण निसर्गवाद्याच्या अभ्यासामुळे अखेर बीगल हे इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध गलबतांपैकी एक ठरले.