ऊर्टचा मेघ
ऊर्टचा मेघ हा एक धूमकेतूंचा विरळ मेघ असून त्याच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये जबरदस्त संभ्रम आहे. सूर्यापासून तो ५०,००० खगोलीय एकक किंवा १ प्रकाशवर्ष अंतरावर आहे असे मानतात. मित्र ताऱ्याच्या तो चारपट जवळ आहे.
जॅन हेडील ऊर्ट या डच खगोलशास्त्रज्ञाला अनेक धूमकेतूंच्या अभ्यासानंतर समजले की अनेक धूमकेतूंच्या कक्षा फारच लंबगोलाकृती आहेत. आपल्या कक्षेच्या सीमेजवळून ते सूर्याला फेरी मारून ते परत आपल्या कक्षेकडे जातात. साधारणपणे बहुतेक धूमकेतूंची कक्षा ही पृथ्वी-सूर्य यांच्या अंतरापेक्षा साधारण एक लाख खगोलीय एकक एवढी मोठी आहे. तसेच धूमकेतूंची सूर्यमालेमध्ये येणाची दिशा ठराविक नसून ते कोणत्याही मार्गाने सूर्यमालेमध्ये प्रवेश करतात. यावरून ऊर्ट या शास्त्रज्ञाने असा अंदाज वर्तविला की सूर्यमालेपासून साधारण ५००० ते १,००,००० खगोलीय एकक एवढ्या अंतरामध्ये बर्फ आणि धुळीचे गोळे असलेला प्रचंड ढग सूर्यमालेभोवती विखुरलेला असावा.
मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या तसेच नेपच्यून ग्रहाच्या पुढे असलेल्या क्यूपर बेल्ट सारख्या लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणे या ऊर्टच्या मेघाची कक्षा गोलाकार पसरट प्रतलाची नसून हा मेघ सूर्यमालेभोवती सर्व बाजूंनी व्यापलेला आहे.
काही वेळेस अंतर्गत हालचालीमुळे तर काही वेळेस गुरुत्वाकर्षणामुळे ह्या बर्फाने व धुळीने व्यापलेल्या मेघातील मोठे गोळे सूर्यमालेमध्ये खेचले जातात. सुरुवातीला हे फक्त बर्फाचे आणि धुळीचे गोळे असतात परंतु जसजसे सूर्याजवळ येऊ लागतात तसतसे सूर्याच्या ऊर्जेमुळे त्यातील बर्फ आणि वायू वितळून मोकळे होतात व त्या गोळ्यांमागे शेपटी तयार होते. आणि त्यांस आपण धूमकेतू म्हणतो.
शास्त्रज्ञांच्या मते ह्या ऊर्ट मेघातील सर्व गोळ्यांचे एकूण वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या जास्तीतजास्त ४० पट तर कमीतकमी १० पट असावे.