इफ्तिखार आरिफ (२१ मार्च, इ.स. १९४३:लखनौ, उत्तर प्रदेश, भारत - ) हे एक पाकिस्तानी गझलकार व कवी आहेत.

लखनौ विद्यापीठातून १९६२मध्ये आरिफ बी.ए. झाले व १९६४मध्ये समाजशास्त्र विषय घेऊन एम.ए. झाले. त्याच वर्षी ते पाकिस्तानला गेले. १९७७पर्यंत पाकिस्तान रेडिओ व टी.व्ही विभागात त्यांनी नोकरी केली. त्यानंतर १९८०पर्यंत लंडनमधील ते बी.सी.सी.आय.बँकेत जनसंपर्क अधिकारी होते. १९८० ते १९९० या काळात आरिफ हे लंडममधल्या ’उर्दू मर्कज’चे ते प्रभारी प्रशासक होते. ही संस्था त्यांनी नावारूपास आणून साहित्यिक केंद्र म्हणून मोठी केली. आरिफ १९९१ला कराचीला परतले. आल्यावर त्यांनीे अनेक संस्थांसह 'मुक्तदरा कौमी जबान' या विख्यात संस्थेद्वारे साहित्यसेवा करायला आरंभ केला.

इफ्तिखार आरिफ यांची उर्दू शायरी संपादन

गझला आणि कविता या दोन्ही काव्यप्रकारांवर असामान्य पकड असलेल्या आरिफ यांनी आपल्या शायरीत संस्कृती, परंपरा व धार्मिकता यांचा समतोल साधला आहे. त्यांनी भाषेचे पावित्र्य जपले असे मानले जाते. हळूहळू त्यांची शैली अनेक शायरांनी अंगीकारली. काही भारतीय शायरांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो.

मात्र, इतर शायरांप्रमाणे आरिफ यांचे शेर सहजासहजी उमगत नाहीत. नासिख, आतिश, दबीर, अनीस यांसारख्या लखनवी शायरांच्या परंपरेतून साकारलेली ही शायरी इस्लामी पुराणकथांच्या व संस्कृतीच्या ज्ञानाची वाचकांकडून अपेक्षा करते.

इफ्तिखार आरिफ यांच्या जवळपास साऱ्या कवितांचे इंग्रजीत अनुवाद झाले असून ते 'द ट्वेल्थ मॅन' आणि 'रिटर्न इन द सिजन ऑफ फिअर'या दोन संग्रहात समाविष्ट झाले आहेत.

उर्दूचे प्रसिद्ध कवी कैफी आझमी हे इफ्तिखार आरिफ यांना पाकिस्तानची मोठी दौलत मानतात.

इफ्तिखार आरिफ यांचे उर्दू काव्यसंग्रह संपादन

  • किताबे-दिल ओ दुनिया (समग्र आरिफ)
  • जहाने मालूम
  • मेहरे-दो-नीम
  • शहरे-इल्म के दरवाजे पर
  • हर्फे-वारियाब