डोरा अँजेला इझाडोरा डंकन ही आधुनिक अमेरिकन नर्तकी होती. हिचा जन्म सान फ्रान्सिस्को येथे झाला. बालपणीच तिने बॅले नृत्याचे धडे घेतले पण लवकरच सांकेतिक आणि साचेबंद नृत्यशैली अव्हेरून, तिने स्वतःची व्यक्तिविशिष्ट शैली निर्माण केली. शिकागो येथे १८९९ मध्ये तिने पहिल्यांदा नृत्य सादर केले पण ते फारसे यशस्वी ठरले नाही. त्यामुळे ती युरोपला गेली.

इझाडोरा डंकन

पॅरीस येथे १९०० मध्ये तिने नृत्याच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. त्या ठिकाणी तिला अल्प प्रमाणातच यश लाभले. त्यानंतर तिने बूडापेस्ट (१९०३), बर्लिन (१९०४), लंडन व न्यू यॉर्क (१९०८) येथे यशस्वी रीत्या नृत्ये सदर केली. १९०५ मध्ये ती रशियाला गेली असता मीशेल फॉकीन या नर्तकावर तिचा विलक्षण प्रभाव पडला. अनवाणी पावलांनी व ग्रीक धर्तीच्या सैलसर वस्त्रप्रावरणांमध्ये नृत्य करण्याच्या तिच्या धाटणीचे पुढे अनुकरण झाले. ग्लुक, व्हाग्नर, बेथोव्हन इ. संगीतकारांच्या रचनांचा तिने नृत्यासाठी वापर करून घेतला. नृत्यामध्ये तिने क्रांतिकारी बदल घडवून आणले. नृत्यावरील कृत्रिम तांत्रिक बंधने झुगारून देऊन सहज, नैसर्गिक आणि उत्स्फूर्त शारीर हालचालींचा तिने नृत्यातून आविष्कार घडविला. ही विमुक्त नृत्यशैली होय. या दृष्टीने ती आधुनिक नृत्याची जनक मानली जाते. माय लाइफ ( १९२५ रोहिणी भाटेकृत मराठी भाषांतर मी—इझाडोरा!, १९७५) हे तिचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. नीस येथे तिचे अपघाती निधन झाले.   

संदर्भ संपादन

१. https://vishwakosh.marathi.gov.in/17667/