आयुष (चिकित्सा प्रणाली)

आयुष चिकित्सा प्रणाली अंतर्गत भारतीय चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो. प्रामुख्याने आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या शास्त्रांमधील अभ्यासक्रम आणि संशोधन कार्याचा विकास हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे.

आरोग्य सेवा क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापलेल्या अनेक समित्यांनी भारतातील औषधांच्या पारंपरिक प्रणाली सुधारण्यावर भर दिला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९६१—१९६६) आयुर्वेदात डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आणि १९७० मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची स्थापना केली गेली, त्यानंतर १९७३ मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी या संस्थेची स्थापन झाली. सहाव्या (१९८०—१९८५) आणि सातव्या (१९८५—१९९०) पंचवार्षिक योजनांमध्ये औषधे विकसित करणे आणि ग्रामीण कौटुंबिक आरोग्यासाठी चिकित्सकांचा उपयोग करण्यासाठी तरतुदी केल्या गेल्या. आठव्या पंचवार्षिक योजनेत (१९९२—१९९७) आयुषला मुख्य प्रवाहात आणण्याकडे लक्ष देण्यात आले आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत मार्च १९९५ मध्ये भारतीय औषधी व होमिओपॅथी विभाग सुरू करण्यात आला. नोव्हेंबर २००३ मध्ये विभागाचे नाव ‘आयुष’ असे करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात आयुष चिकित्सकांना एकत्रित करण्यासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना ९ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली. श्री. श्रीपाद नाईक हे आयुष मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत.

“निरामय भारत प्रस्थापित करण्यासाठी अग्रक्रमाने स्वीकारार्ह जीवनशैली व उपचार पद्धतींची प्रतिष्ठापना करणे” हे आयुष मंत्रालयाचे दृष्टी विधान आहे.

उद्दिष्टे:

संपादन

आयुष मंत्रालयाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत —

  1. पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धती आणि होमिओपॅथी महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.
  2. कार्यरत असलेल्या संशोधन संस्थांना पाठिंबा देणे आणि  या चिकित्सा प्रणालीमध्ये प्रभावी उपाय असलेले रोग शोधून त्यावर कालबद्ध संशोधन उपक्रम राबवणे.
  3. या प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींच्या संवर्धन, लागवड आणि पुनर्निर्माण यासंबंधी योजना आखणे.
  4. भारतीय औषध प्रणाली आणि होमिओपॅथी औषधांसाठी औषधिकोश (फार्माकोपिया; Pharmacopoeia) मानक विकसित करणे.

आयुष्मान भारत योजने’चा आयुष मंत्रालय हा एक अविभाज्य घटक आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रत्येक स्तरावर नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात या मंत्रालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. ग्राम पातळीतील नागरिकांची आरोग्य व्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम या मंत्रालयाकडे आहे. ५०,००० पेक्षा अधिक मुले ‘स्वस्थ बालकांसाठी होमिओपॅथी’मध्ये सहभागी झाली आहेत. या विभागाकडून आत्तापर्यंत २९,५७६ शोध निबंध (Research paper) प्रसिद्ध झाले आहेत. डिसेंबर २०१९ च्या माहितीनुसार देशभरामध्ये आयुष्य विभागाची ३,९८६ इस्पितळे तसेच २७,१९९ दवाखाने आहेत. आयुष विभागांतर्गत सु. १३,८७,५३९ चिकित्सक व त्यांच्याकडून सु. १७,९३,३३,१४७ रुग्ण चिकित्सा घेत आहेत. या विभागांतर्गत ९१४ महाविद्यालये असून त्यांमध्ये सु. ५२,७२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयुष मंत्रालय अंतर्गत ८,९५४ औषध निर्मिती उद्योग तसेच ११ राष्ट्रीय संस्था आहेत. मार्च २०२० नुसार ८२२ चालू संशोधन उपक्रम या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू आहेत. २०१९-२०२० अर्थसंकल्पामध्ये या मंत्रालयाला एकूण १९३९.७६१ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात अली आहे.