आधुनिक काळातील भारतीय नृत्य

भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच नृत्यकला राजाश्रयाकडून लोकाश्रयाकडे वळली. संस्थानिक व राजे यांच्या दरबाराऐवजी ती रंगमंचावर प्रेक्षकांपुढे सादर केली जाऊ लागली. त्यामुळे आधुनिक काळात सामान्य माणसालाही भारतीय अभिजात नृत्यकलेची ओळख झाली. अभिजीत नृत्यकलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न या काळात विशेषत्वाने झाले. रवींद्रनाथ टागोर, रूक्मिणीदेवी ॲरंडेल, मेनका, वळ्ळत्तोळ नारायण मेनन, उदय शंकर इ. नामवंत व्यक्तींनी नृत्यशिक्षणकेंद्रे उभारली. महाकवी पळ्ळत्तोळ यांनी कथकळीच्या शिक्षणासाठी उभारलेले ‘केरल कला मंडलम्’ (१९३०) रूक्मिणीदेवी ॲरंडेल यांचे अड्यार येथील ‘कलाक्षेत्र’ (१९३६) मेनका या नर्तकीने खंडाळा येथे स्थापन केलेली नृत्यशाळा (१९३८) ही काही महत्त्वाची नृत्यशिक्षणकेंद्रे होत. अभिजात नृत्याबाबत स्वातंत्र्योत्तर काळात झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे या परंपरा विशिष्ट प्रांतापुरत्या मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने भारतीय बनल्या आहेत. या सर्व शैली सर्व भारतभर पाहण्यास आणि शिकण्यास उपलब्ध झाल्यामुळे प्रांता-प्रांतातील सांस्कृतिक देवाणघेवाण व एकात्मता वाढण्यास मोठाच हातभार लागला आहे.

प्रख्यात नर्तक उदय शंकर यांनी आधुनिक भारतीय नृत्याचा परिचय पाश्चिमात्य जगास करून दिला. अतिपूर्वेकडील नृत्ये, भारतीय अभिजात नृत्यकला, भारतीय लोकनृत्ये तसेच पश्चिमी बॅले यांच्या अभ्यासातून त्यांनी स्वतःची वेगळीच नृत्यशैली निर्माण केली. लेबर अँड मशिनरी, द ऱ्हिदम ऑफ लाइफ यासारखी आधुनिक नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली. अलमोडा येथे ‘इंडिया कल्चर सेंटर’ स्थापन करून (१९३८) नृत्यशिक्षणाची सोय केली. प्रयोगशीलता व नावीन्यपूर्ण कल्पना यांद्वारे भारतीय नृत्याला समृद्ध करण्याची त्यांची कामगिरी महत्त्वाची आहे.

बॅले

आधुनिक काळात बॅले हा नृत्यनाट्यप्रकार भारतात विशेषत्वाने लोकमान्यता पावत असल्याचे दिसून येते. उदय शंकर यांच्याप्रमाणे मेनका यांची कृष्णलीला, मेनकालास्यम्, मालविकाग्निमित्रम्, ही नृत्यनाट्ये कृष्णन् कुट्टींची फॉल्स प्राइड, द टेरिबल वून, बर्थ ऑफ आवर नेशन शांतिवर्धन यांची रामायण इन पपेट, मेघदूत, डिस्कव्हरी ऑफ इंडिया पार्वतीकुमार यांची देख तेरी बम्बई, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, सचिन शंकर यांची शिवपार्वती, रामायण, शिवाजी, सुरेंद्र वडगावकर, यांचे तुकाराम ही नृत्यनाट्ये स्वातंत्र्य काळात व उत्तर काळात सादर केली गेली. उदय शंकर यांचा कलकत्ता येथील ‘डान्स सेंटर’, ग्वाल्हेर येथील ‘रंगश्री लिटल बॅले ट्रूप’ सचिन शंकर यांचे ‘बॅले सेंटर’, मुंबई दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉरिओग्राफी’, ‘भारतीय कला केंद्र’, ‘नाट्य बॅले सेंटर’ इ. नृत्यसंस्थांमध्ये बॅलेचे-भारतीय नृत्यशैलींवर आधारीत नृत्यनाट्यांचे-शिक्षण दिले जाते.

शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी १९२६ साली मुलींसाठी नृत्यशिक्षण सुरू केले. मुलींचे ‘नटीर पूजा’ हे नृत्यनाट्य त्यांनी कलकत्ता येथे सादर केले. मणिपुरी नृत्य, कथकळी नृत्य आणि काही लोकनृत्यांच्या संयोगातून त्यांनी शांतिनिकेतन नृत्यशैली निर्माण केली. नृत्यकलेची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी विशेषत्वाने प्रयत्न केले. पौराणिक कथांवर आधारलेली  चित्रांगदा, श्यामा आणि चंडलिका ही प्रसिद्ध नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली.

आधुनिक काळातील यामिनी कृष्णमूर्ती, पद्मा सुब्रह्मण्यम्, सुचेता भिडे-चापेकर, राम गोपाल, शांता राव, कमला इ. भरतनाट्यम्‌ नर्तक-नर्तकी प्रसिद्ध आहेत. दमयंती जोशी, गोपीकृष्ण, सितारादेवी, रोशन कुमारी, रोहिणी भाटे इ. कथ्थक नृत्यपरंपरेतील नामवंत नर्तक-नर्तकी होत. कथकळीमध्ये पांचाली करुणाकर पणिक्कर, कृष्णन कुट्टी हे नर्तक प्रसिद्ध आहेत. मणिपुरी नृत्यपरंपरेत सविता मेहता, झवेरी भगिनी इ. तर मोहिनीआट्टम्‌मध्ये कल्याणी अम्मा, कनक रेळे इ. ओडिसीमध्ये संयुक्ता पाणिग्रही, सोनल मानसिंग या नर्तकी आणि कूचिपूडीमध्ये श्री वेदांत सत्यम्, वेम्पटी चिन्नम्‌ सत्यम्, कोराडा नरसिंहराव यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

भरतनाट्यम्‌चे शिक्षण देणाऱ्या प्रमुख नृत्यसंस्थांमध्ये बालासरस्वती यांचे ‘क्लासिकल भरतनाट्यम् स्कूल’ (मद्रास), मृणालिनी साराभाई यांची ‘दर्पण’ नृत्यसंस्था (अहमदाबाद), कुप्पय्या पिळ्ळै यांचे ‘श्री राजराजेश्वरी भरतनाट्य कला मंदिर’ (मुंबई), वैजयंतीमालाची ‘नाट्यालय’ ही संस्था (मुंबई-मद्रास), ‘त्रिवेणी’ नृत्यसंस्था (दिल्ली) आदींचा उल्लेख करता येईल. अलवाये येथील ‘उद्योगमंडल’, कोटाकल येथील ‘पी. एस्. व्ही. नाट्यसंघम्’, दिल्लीतील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कथकळी’ या कथकळी नृत्याचे शिक्षण देणाऱ्या भारतातील मान्यवर संस्था आहेत. दिल्लीतील ‘कथक केंद्र’ ही संस्था १९६९ पासून ‘संगीत नाटक अकादमी’ तर्फे चालवली जाते. ‘गांधर्व महाविद्यालय’, दिल्ली ‘भातखंडे संगीत विद्यापीठ’, लखनौ ‘भारतीय विद्या भवन’, मुंबई ‘नृत्यभारती’ पुणे आणि मुंबई ‘कदंब’, अहमदाबाद या कथ्थक नृत्याचे शिक्षण देणाऱ्या अन्य प्रमु्ख संस्था होत. ‘संगीत नाटक अकादमी’ तर्फे चालवली जाणारी इंफाळमधील ‘जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकॅडमी’, तसेच ‘गोविंदजी नर्तनालय’ या मणिपुरी नृत्यशिक्षण देणाऱ्या देशातील प्रमुख संस्था आहेत. ‘डान्स सेंटर’, कलकत्ता ‘परिमल’ अकादमी, मुंबई आणि ‘त्रिवेणी’ दिल्ली येथेही मणिपुरी नृत्याचे शिक्षण दिले जाते. मद्रास येथील ‘कूचिपूडी आर्ट अकॅडमी’ व कूचिपूडी येथील ‘ सिद्धेंद्र कलाक्षेत्र’ हैदराबाद येथील ‘नृत्यशिखर’ ही कूचिपूडी नृत्यशिक्षण देणारी महत्त्वाची केंद्रे आहेत. ओडिसी नृत्याचा शिक्षण ‘कला विकास केंद्र’, कटक ‘कॉलेज ऑफ डान्स अँड म्युझिक’, भुवनेश्वर व दिल्ली येथील ‘नृत्यनिकेतन’, ‘त्रिवेणी’, ‘भारतीय कला केंद्र’ या संस्थांमध्ये दिले जाते.

स्वातंत्र्यानंतर शासकीय पातळीवरही नृत्यकलेस उत्तेजन देण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले. प्रजासत्ताक दिनी प्रसिद्ध नर्तक-नर्तकींना सन्मान्य किताब देऊन त्यांचा गौरव केला जातो. परदेशी जाणाऱ्या सांस्कृतिक शिष्टमंडळांमध्ये नृत्यकलाकारांचा आवर्जून समावेश केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे विविध प्रांतांची प्रादेशिक व लोकनृत्ये सादर केली जातात. त्यांतील उत्कृष्ट नृत्यप्रयोग करणाऱ्या नृत्यसंचांना पारितोषिके दिली जातात. तसेच संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रांतील कलावंतांना दरमहा ३५० रुपयांचा एकूण ५० शिष्यवृत्या दिल्या जातात. ‘संगीत नाटक अकादमी’तर्फे संगीत-नृत्य-नाटक यांचे महोत्सव भरवले जातात. तसेच नृत्यस्पर्धाही आयोजीत केल्या जातात. त्यांतील यशस्वी नर्तक-नर्तकींना पारितोषिके दिली जातात. नृत्यशिक्षणसंस्थांना तसेच नृत्यगुरूंना आर्थिक साहाय्य दिले जाते. नृत्याच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. १९५५ साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य महोत्सवातून ओडिसी, कूचिपूडी यांसारख्या अभिजात नृत्यांचा तसेच आसामच्या छाऊसारख्या लोकनृत्यांचा प्रेक्षकांना सुरेख परिचय करून देण्यात आला. त्यानंतर १९७० व ७१ मध्ये दिल्ली येथे संगीत-नृत्य महोत्सव भरवण्यात आले, त्यांत नामवंतांबरोबरच नवोदित नर्तकनर्तकींनीही भाग घेतला होता. दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या नवव्या आशियाई क्रीडा सामन्यांच्या उद्‌घाटन आणि समारोप सोहळ्यांच्या प्रसंगी जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, त्यांतून विविध प्रदेशांची प्रातिनिधिक वैशिष्ट्यपूर्ण नृत्ये सादर करण्यात आली. दूरदर्शनवर दर आठवड्याला सादर होणाऱ्या संगीत- नृत्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात अनेक ख्यातनाम व कलानिपूण नर्तक-नर्तकींनी आपली हजेरी लावली आहे. [→ नृत्य लोकनृत्य].