एखाद्या कार्यालयात किंवा संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची ,समारंभाची योग्य प्रकारे नोंद करून ठेवणे म्हणजेच 'अहवाल लेखन ' होय.अहवाल लेखन करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू,तारीख,सहभागी व्यक्ती ,प्रतिसाद , समारोप अशा विविध मुद्यांचा वापर केला जातो. एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे ,सर्वेक्षणाचे , विशिष्ट विषयासंबंधी केलेल्या आयोगाचे अहवाल असतात .भविष्यकालीन नियोजनासाठीही अहवाल आवश्यक असतात . अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे त्यावर त्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो.विषयाच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन करणे आवश्यक असते . अहवाल लेखन हा जरी एखादा साहित्यप्रकार नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे .

अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

१.वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता

२.विश्वसनीयता

३.सोपेपणा

४.शब्दमर्यादा

अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची माहिती असणे आवश्यक असते. जे घडले ,जसे घडले त्यावर आधारित अहवाल लेखन करता आले पाहिजे .अहवालाच्या विषयाचे स्वरूप ,वेगळेपण ,वैशिष्ट्य बारकाईने करता आले पाहिजे . अहवाल हा संबंधित कार्यक्रम आणि विषयाच्या स्वरूपानुसार लिहिलेला असावा तो अपुरा, अर्धवट असू नये .