अष्टाध्यायी हा पाणिनी ह्यांनी लिहिलेला संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथात आठ अध्याय असून त्यांवरूनच अष्टाध्यायी हे नाव ह्या ग्रंथाला मिळाले आहे. संस्कृत भाषेच्या व्याकरणावर विविध ग्रंथ लिहिले गेले असले तरी अष्टाध्यायीच्या अध्ययनाची परंपरा आजवर चालत आलेली आहे. तसेच ह्या ग्रंथाला इतर संस्कृत व्याकरणाच्या ग्रंथांच्या तुलनेत अधिक कीर्ती लाभली आहे.
अष्टाध्यायी ह्या ग्रंथावर वार्तिके, टीका, भाष्ये अशा स्वरूपाचे अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातून पाणिनीय व्याकरणपरंपरा ह्या नावाने ज्ञात असलेली परंपरा निर्माण झाली. जगभरातील अनेक अभ्यासकांनी ह्या ग्रंथाविषयी आणि ह्या ग्रंथाद्वारे पुढे निर्माण झालेल्या परंपरेविषयी चिकित्सक स्वरूपाचे लेखन केले आहे. भाषाभ्यासाच्या काही परंपरांवर ह्या पाणिनीय परंपरेचा प्रभाव पडलेला आहे. हा ग्रंथ विलक्षण तांत्रिक स्वरूपाचा असून भाषेचे (लक्ष्य भाषेचे) व्याकरण सांगण्यासाठी जणू काही दुसरी भाषाच (अधिभाषा) ह्या ग्रंथात वापरली आहे. ही भाषा आत्मसात केल्यावाचून ह्या ग्रंथाचा बोध होत नाही. ह्या तांत्रिक वैशिष्ट्यांमुळेच हा ग्रंथ अधिक लक्षणीय ठरला आहे.

ग्रंथाचे स्थूल स्वरूप संपादन

अष्टाध्यायी हा सूत्ररूप ग्रंथ आहे. अष्टाध्यायीत सुमारे चार हजार सूत्रे आहेत. ही सूत्रे विशिष्ट क्रमाने लावण्यात आली आहेत. ह्या क्रमामुळे सूत्रांचा विशिष्ट पद्धतीने अर्थ लावला की संस्कृत भाषेतील मान्य (साधु) रूपे साधता येतात आणि अमान्य (असाधु) रूपे टाळता येतात. पाणिनीय व्याकरणाच्या परंपरेत सूत्र ह्या शब्दाचे लक्षण (व्याख्या) पुढीलप्रमाणे श्लोकबद्ध करण्यात आले आहे.

अल्पाक्षरम् असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम् ।
अस्तोभम् अनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः ।।[१]

अर्थ : ज्यात कमीत कमी अक्षरे आहेत, जे अर्थ व्यक्त करण्याच्या दृष्टीने शंकामुक्त आहे, ज्यात विषयाचे सार आले आहे, जे (प्रस्तुत विषयाच्या विवेचनात) सगळीकडे सारख्याच प्रकारे लागू पडते, ज्यात अनावश्यक गोष्टी नाहीत आणि जे दोषरहित आहे त्याला सूत्रांचे जाणकार सूत्र असे म्हणतात.

अष्टाध्यायी ह्या ग्रंथाला सूत्रपाठ हे पर्यायी नावही आहे. ह्या सूत्रपाठाबरोबर म्हणजे अष्टाध्यायीबरोबर गणपाठ, धातुपाठ ह्यांचेही ज्ञान अष्टाध्यायीच्या अध्ययनासाठी आवश्यक आहे. धातुपाठात मुख्यत्वे क्रियावाचक शब्द आहेत तर गणपाठात धातूंपेक्षा वेगळ्या (नामे, अव्यये इ.) इतर शब्दांचा समावेश आहे. अष्टाध्यायीतील सूत्रांचा अर्थ लावताना गणपाठ आणि सूत्रपाठ ह्यांचा आधार घ्यावा लागतो. उदा. भूवादयोः धातवः ३।२।१ ह्या सूत्राचा अर्थ, ‘धातुपाठात नोंदवलेल्या शब्दांच्या यादीमधल्या भू ने सुरू होणाऱ्या शब्दांना धातू म्हणावे’असा होतो. धातुपाठातला पहिला शब्द अर्थातच भू (हा धातू) आहे. असेच अनेक निर्देश अष्टाध्यायीत येतात.
अष्टाध्यायीतील आठ अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायाचे ४ भाग आहेत. ह्या प्रत्येक भागाला पाद (चार भागांपैकी एक म्हणजे पाव भाग) असे म्हणतात. प्रत्येक पादातील सूत्रांची संख्या वेगवेगळी आहे.

रचनाविशेष संपादन

अष्टाध्यायी ह्या ग्रंथाच्या रचनेची वैशिष्ट्ये पुढील घटकांच्या आधारे सांगता येतील. ०१. शिवसूत्रे, ०२. प्रत्याहार, ०३. सूत्रांचे प्रकार, ०४. परिभाषा (सूत्रांचा अर्थ लावण्याचे संकेत)

शिवसूत्रे संपादन

शिवसूत्रे ही अष्टाध्यायीच्या भाषेची मुळाक्षरे आहेत. ही १४ सूत्रे पाणिनीने स्वतः रचली की त्याला परंपरेने लाभली ह्याविषयी मतभेद आहेत. ह्या सूत्रांत संस्कृत भाषेतील वर्ण हे विशिष्ट क्रमाने रचण्यात आले आहेत. हा क्रम परंपरेने आजही रूढ असलेल्या क्रमापेक्षा वेगळा आहे. ही शिवसूत्रे(माहेश्वरी सूत्रे) पुढीलप्रमाणे आहेत.

०१. अइउण्
०२. ऋऌक्
०३. एओङ्
०४. ऐऔच्
०५. हयवरट्
०६. लण्
०७. ञमङणनम्
०८. झभञ्
०९. घढधष्
१०. जबगडदश्
११. खफछठथचटतव्
१२. कपय्
१३. शषसर्
१४. हल्
शिवसूत्रांतील प्रत्येक सूत्राच्या शेवटी एक व्यंजन जोडलेले आहे. त्याला इत् असे म्हणतात. त्याचा उपयोग प्रत्याहार तयार करण्यासाठी करण्यात येतो. हयवरट् ह्या सूत्रापासून व्यंजनांची सुरुवात होते. तिथे व्यंजनांत येणारा अकार हा उच्चारापुरता असतो. याला अपवाद म्हणजे, लण् ह्या सूत्रातील ल ह्यातील अकार. हा अकार मात्र इत् आहे. (ह्यामुळेच र = र, ल् + अ असा प्रत्याहार सिद्ध होतो.) शिवसूत्रांना वर्णसमाम्नाय किंवा अक्षर समाम्नाय असेही म्हणतात.

प्रत्याहार संपादन

प्रत्याहार हे अष्टाध्यायीच्या भाषेतील मूलभूत शब्दघटक आहेत असे मानता येईल. शिवसूत्रांपैकी एखाद्या सूत्रातील एखादा वर्ण प्रथम घेऊन त्यापासून त्यापुढे येणाऱ्या कोणत्याही इत् व्यंजनापर्यंतच्या वर्णांनी मिळून प्रत्याहार सिद्ध होतात. उदा. पहिल्या शिवसूत्रातील अइउण् ह्यांतील पहिला अ आणि ण् हा इत् वर्ण ह्यांनी मिळून अण् असा प्रत्याहार सिद्ध होतो. त्याने अ, इ, उ ह्या तीन वर्णांचा निर्देश होतो. तर पहिल्या शिवसूत्रातील इ आणि दुसऱ्या शिवसूत्रातील शेवटचा क् हा इत् वर्ण ह्यांपासून इक् असा प्रत्याहार सिद्ध होतो. त्याने इ, उ, ऋ, ऌ ह्या वर्णांचा निर्देश होतो.
अष्टाध्यायीत अशा प्रकारे तयार केलेले एकूण ४३ प्रत्याहार वापरलेले आहेत.[२]

अनुक्रमांक प्रत्याहार समाविष्ट वर्ण
०१ अण् अ, इ, उ
०२ अक् अ, इ, उ, ऋ, ऌ
०३ अच् अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ
०४ अट अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र
०५ अण् अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र, ल
०६ अम् अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न
०७ अश् अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द
०८ अल् अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स, ह
०९ इक् इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स, ह
१० इच् इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ
११ इण् इ, उ, ऋ, ऌ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ, ह, य, व, र, ल
१२ उक् उ, ऋ, ऌ
१३ एङ् ए, ओ
१४ एच् ए, ओ, ऐ, औ
१५ ऐच् ऐ, औ
१६ हश् ह, य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द
१७ हल् ह, य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स, ह
१८ यण् य, व, र, ल
१९ यम् य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न
२० यञ् य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ
२१ यय् य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प
२२ यर् य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स
२३ यश् य, व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द
२४ वल् व, र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स, ह
२५ रल् र, ल, ञ, म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स, ह
२६ मय् म, ङ, ण, न, झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प
२७ ङम् ङ, ण, न
२८ झष् झ, भ, घ, ढ, ध
२९ झश् झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द
३० झय् झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प
३१ झर् झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स
३२ झल् झ, भ, घ, ढ, ध, ज, ब, ग, ड, द, ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स, ह
३३ भष् भ, घ, ढ, ध
३४ जश् ज, ब, ग, ड, द
३५ बश् ब, ग, ड, द
३६ खय् ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प
३७ खर् ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, ष, स
३८ छव् छ, ठ, थ, च, ट, त
३९ चय् च, ट, त, क, प
४० चर् च, ट, त, क, प, श, ष, स
४१ शर् श, ष, स
४२ शल् श, ष, स, ह
४३ र, ल

प्रत्याहारांमुळे आवश्यक त्या वर्णांचा संकेतरूपान अल्पाक्षरी निर्देश करणे शक्य होते. उदा. हलोऽनन्तराः संयोगः । (अन्तरा:, अंतर न सोडता)एकालगत एक आलेले (म्हणजे मध्ये स्वर नसलेले) हल् (व्यंजन वर्ण) म्हणजे संयोग. इथे हल् ह्या लहानशा प्रत्याहाराने सर्व व्यंजनांचा थोडक्यात उल्लेख करता आला आहे. स्वर नसलेल्या व्यंजनांना हलन्त म्हणतात, तेव्हा पाय मोडक्या देवनागरी अक्षरांसाठी वापरला जाणारा हलन्त हा शब्द, हल् ह्या प्रत्याहारावरून बनला आहे.

सूत्रांचे प्रकार संपादन

अष्टाध्यायीतील सूत्रांचे त्यांच्या कार्याप्रमाणे विविध प्रकार मानण्यात येतात.

संज्ञासूत्रे संपादन

ही सूत्रे अष्टाध्यायीच्या विवेचनात वापरलेल्या संज्ञांचे अर्थ निश्चित करतात. उदा. वृद्धिः आत् ऐच् ।।१।१।१।। ह्या सूत्रात वृद्धिः ह्या संज्ञेचा अर्थ ऐच् असा होतो असे म्हटले आहे. म्हणजे वृद्धिः ह्या संज्ञेचा अष्टाध्यायीत निर्देश येईल तिथे त्याचा अर्थ ऐ, औ हे वर्ण असा होतो. संस्कृत व्याकरणात परंपरेने चालत आलेल्या अनेक संज्ञा अष्टाध्यायीत वापरलेल्या असल्या तरी त्यांचे अर्थ मात्र वेगळे असू शकतात. उदा. सर्वनाम ही संज्ञा अष्टाध्यायीत सारखी रूपे होणाऱ्या शब्दांच्या एका गटाला उद्देशून वापरली आहे. त्यात परंपरेने सर्वनाम मानलेले काही शब्द येतात उदा. त्यद्, तद्, एतद् इ. पण सर्व,विश्व, एक, द्वि असे शब्दही येतात.

परिभाषासूत्रे संपादन

परिभाषा म्हणजे विशिष्ट क्षेत्रातील व्यवहाराचे संकेत किंवा नियम. अष्टाध्यायीतील परिभाषासूत्रे ही सूत्रांतील पदांचे परस्परसंबंध, त्यांचे त्यामुळे होणारे अर्थ ह्यांची निश्चिती करतात. उदा. तस्मिन् इति निर्दिष्टे पूर्वस्य १।१।६६ ह्या परिभाषासूत्रात ज्या सूत्रात सप्तमी विभक्तियुक्त पद वापरले असेल तिथे सांगितलेले कार्य हे लगोलग आधी असलेल्याला करावे असे म्हटले आहे. त्यामुळे इकः यण् अचि ६।१।७७ ह्या सूत्राचा अर्थ निश्चित होतो. अचांच्या (अ, इ, उ, ऋ, ऌ, ए, ओ, ऐ, औ ) लगोलग आधी असलेल्या इकांच्या (इ, उ, ऋ, ऌ) जागी यण् (य, व, र, ल) करावे ह्यात 'अचांच्या लगोलग आघी' हा अर्थ अच् शब्दाच्या सप्तमी विभक्तीतील 'अचि' ह्या रूपाने निश्चित करण्याचे काम परिभाषासूत्राने केले.

अधिकारसूत्रे संपादन

अष्टाध्यायीत अधिकारसूत्रे विशिष्ट विषयाच्या विवेचनाची मर्यादा स्पष्ट करतात. अष्टाध्यायीतील सूत्राचा अर्थ लावताना अधिकारसूत्रातील एखादे पद किंवा सबंध अधिकारसूत्र अध्याहृत धरण्यात येते.

विधिसूत्रे संपादन

नियमसूत्रे संपादन

अतिदेशसूत्रे संपादन

लाघवाचे उपाय संपादन

अष्टाध्यायीच्या अध्ययनाची परंपरा संपादन

मराठीच्या व्याकरणांवरील अष्टाध्यायीचा प्रभाव संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ काशीनाथ वासुदेव अभ्यंकर; श्रीमद्भगवत्पतञ्जलिविरचित व्याकरणमहाभाष्य : मूळ आणि मराठी भाषांतर खंड सातवा (प्रस्तावना खंड); ३री आवृत्ती; निवाहक वि. ना. दीक्षित, संस्कृतविद्या परिसंस्था; पुणे; २००७
  2. ^ रामचंद्र दत्तात्रेय किंजवडेकर; मराठी लघुसिद्धान्तकौमुदी : संधि आणि सुबन्त प्रकरण, संपादक : श्रीपादशास्त्री किंजवडेकर; २री आवृत्ती; व्यास प्रकाशन; पुणे, १९६

बाह्य दुवे संपादन