अर्व्हाइन (कॅलिफोर्निया)

अर्व्हाइन हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५८,३८६ होती. यांपैकी ४५% व्यक्ती आशियाई वंशाच्या होत्या.

ऑरेंज काउंटीमधील हे शहर अर्व्हाइन कंपनीने नियोजित व विकसित केलेले आहे. येथे अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या तसेच ब्लिझार्ड एंटरटेनमेंटची मुख्यालये आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट अर्व्हाइन तसेच कॉंकोर्डिया विद्यापीठ यांसह अनेक उच्चशिक्षण संस्थांची आवारे या शहरात आहे.

इतिहास

संपादन

अर्व्हाइनजवळील प्रदेशात गाब्रियेलेन्यो जमातीची लोक सुमारे २,००० वर्षांपूर्वी राहत होती. इ.स. १७६९च्या सुमारास गास्पर दि पोर्तोला या पहिल्या युरोपीय व्यक्तीने या प्रदेशात वस्ती केली. त्यानंतर येथे अनेक गढ्या, मिशन आणि रांच तयार झाल्या. १८२१मध्ये मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कॅलिफोर्नियाचा मोठा भाग मेक्सिकोच्या आधिपत्याखाली आला. मेक्सिकोच्या नागरिकांनी ही जमीन वाटण्यात आली. त्यातील रांचो सांतियागो दि सांता आना, रांचो सान वाकिन आणि रांचो लोमास दि सांतियागो या तीन मोठ्या रांचचे एकत्रीकरण होउन अर्व्हाइन रांच तयार झाली. कालांतराने या प्रदेशात तयार झालेल्या गावास अर्व्हाइन असे नाव देण्यात आले.