अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना मराठीसह एकूण बारा भाषा येतात.

रेडिओवरील कारकीर्दसंपादन करा

अरुण खोपकर सातवी आठवीपासूनच रंगमंचावर वावरायला लागले. त्यानंतर रेडिओवर लहान मुलांच्या 'गंमतजंमत' या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला, तेव्हा त्यांची व पुलंची ओळख झाली. रेडिओवर त्यानंतर ते श्री.ना. पेंडसे यांच्या 'हत्या' या कादंबरीच्या वाचनातही खोपकर सहभागी झाले. खोपकरांनी रेडिओवरील बऱ्याच म्हणजे ७०-८० श्रुतिका केल्या.

नाटकेसंपादन करा

खोपकरांनी पुढे नाटकातही कामे केली. भक्ती बर्वे, सुधा करमरकर, वसुंधरा पेंडसे या त्यांच्यासोबत होत्या. त्या काळात त्या 'नाट्यनिकेतन'च्या दौऱ्यांवरही गेल्या होत्या. तेव्हा बालमोहन नाट्यसंस्थेमध्ये गंगाधर पाटील, गुमास्ते हे शिक्षक होते. पाटीलसरांनी त्यांचा कल ओळखला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. या अभिनयाच्या अनुभवांतर अरुण खोपकर साहित्यलेखनाकडे वळले.

ज्याची भुरळ पडेल तेसंपादन करा

ज्याची भुरळ पडेल ते करायचे, असे खोपकरांना वाटे. आठवी-नववीत असतानाच 'सौंदर्य आणि साहित्य'सारखा सौंदर्याशास्त्रावरचा ग्रंथ त्यांचा वाचून झाला होता. त्यांना तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करावासा वाटत होता आणि विज्ञानातही रस होता. ज्यांनी इंग्रजी-मराठी डिक्शनरी लिहिली ते खोपकरांचे इंग्रजीचे शिक्षक एस.व्ही. सोहनी त्यांना मला म्हणाले, ’हे बघ, तू जर साहित्याकडे गेलास तर तुला विज्ञानाचा अभ्यास करता येणार नाही, मात्र तू विज्ञान शिकलास तर कलेचा, तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करण्यात काही अडचण येणार नाही’ म्हणून अरुण खोपकर बी.एस्‌सी. झाले आणि ते करताकरता त्यांनी कलाशाखेचा अभ्यास सुरू केला. त्यांना मराठी शिकवायला रा.ग. जाधव, म.वा. धोंड, आणि विजया राजाध्यक्ष होत्या. या प्राध्यापकांमुळे खोपकरांना भाषेची गोडी लागली आणि त्यांचा नाटकाचा छंद कमी झाला. त्याच काळात अरुण खोपकरांची लच्छू महाराजांशी ओळख झाली आण‌ि खोपकरांना नृत्यातही रस वाटू लागला. मध्येच त्यांनी मणी कौलच्या 'आषाढका एक दिन' मध्ये भूमिका करण्याचीही संधी मिळाली, आणि अरुण खोपकरांचा चित्रपटाकडे प्रवास सुरू झाला...

चित्रपट-कारकीर्दसंपादन करा

चित्रपट हा खोपकरांचा खरा ध्यास आणि श्वास. त्यामुळेच पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेमध्ये ('एफटीआयआय') चित्रपट-दिग्दर्शनाचे रीतसर शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिनेक्षेत्र हेच कार्यक्षेत्र निवडले आणि तेव्हापासून चित्रपट करणे आणि चित्रपटांवर बोलणे हे जणू त्यांचे जीवनध्येय बनले. सिनेमाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे तर ते पिढी दरपिढीला शिकवत आहेत. निखिलेश चित्रे, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे असे अनेक चित्रपटसमीक्षक खोपकरांच्या चित्रपटविषयक मार्गदर्शन आणि गप्पाटप्पांतून घडले. खोपकरांमध्ये चांगला कथाकथक दडलेला आहे. त्यामुळे लिहिणे असो, बोलणे असो किंवा एखाद्या विषयावर फिल्म करणे असो, प्रत्येक कृतीत त्यांचा आश्वासक सूर लागतो. त्यामुळे वाचणारा, ऐकणारा आणि पाहणारा त्यांच्याशी, त्यांच्या कलाकृतीशी सहज जोडला जातो.

त्यांनी भूपेन खक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.

अरुण खोपकर विविध संस्थांमध्ये चित्रपट ह्या विषयाच्या थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे वर्ग घेतात. त्यांनी चित्रपटकलेच्या सौंदर्यप्रधान अंगाबद्दल लिहिलेले संशोधन लेख अनेक राष्ट्रीय आणि आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

स्मिता पाटील यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात अरुण खोपकर यांच्या ’डिप्लोमा’साठी बनवलेल्या लघुपटापासून झाली.

साहित्य आणि चित्रपटसंपादन करा

 • आषाढका एक दिन (चित्रपटातील भूमिका)
 • इमेजेस ऑफ इंडिया : माय टाऊन (माहितीपट, १९८८)
 • ओरल सेल्फ एक्झॅमिनेशन (माहितीपट, १९८९)
 • कथा दोन गणपतरावांची (पटकथा)
 • Confronting Tobacco (Documentary, १९८४)
 • कलर्स ऑफ ॲबसेन्स (माहितीपट, १९९३)
 • Computer-aided Design (Documentary, १९७६)
 • गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (मराठी, राष्ट्रीय पुरस्कारप्रारप्त पुस्तक)
 • Guru Dutt - A Tragedy in Three Acts
 • ग्रामायण (माहितीपट, १९८१)
 • चलत्‌-चित्रव्यूह (मराठी)
 • वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
 • चित्रव्यूह (मराठी)
 • Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
 • Threads that Bind (चित्रपट दिग्दर्शन)
 • डिप्लोमा
 • ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणारा लघुपट
 • निर्णय (चित्रपट)
 • प्रवाही (माहितीपट)
 • फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०)
 • रसिकप्रिया (लघुपट)
 • लीला सॅम्पसन (लघुपट)
 • लोकप्रिया (लघुपट)
 • व्हॉल्यूम झीरो (लघुपट)
 • संचारी (भरत नाट्य संदर्भात लीला सॅम्सन यांच्याशी संवाद साधणारा माहितीपट, १९९१)
 • हाथी का अंडा (चित्रपट, २००२)

पुरस्कारसंपादन करा

 • खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.
 • त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या चित्रपटाला मे १३ १९९६ रोजी कुटुंब कल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
 • त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' आणि ’चित्रव्यूह’ या चरित्रात्मक निबंधांच्या जोड पुस्तकांना २०१५ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

पेंग्विन बुक्स

बुकगंगा

अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५

'महाराष्ट्र टाइम्स'मधील परिचय - १९ डिसेंबर २०१५

'थोबाडीत मारून भाषा येत नाही!' - मुलाखत, 'महाराष्ट्र टाइम्स', २७ डिसेंबर २०१५


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.