हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदीय आहे. यालाच ‘अमृतबिंदू उपनिषद’ असेही नाव आहे. या उपनिषदात एकूण बावीस मंत्र आहेत; ज्यांमध्ये ब्रह्मसाक्षात्काराच्या क्रमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे.

'मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे’ या शाश्वत सत्याच्या उद्घाटनासोबतच उपनिषदाच्या शुभारंभ झालेला आहे. मनास निर्विषय बनवून मुक्तीची प्राप्ती, निर्विषय बनविण्याचा विधी, स्वर (प्रणव) तसेच अस्वर यांद्वारे व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्माचे अनुसंधान, तिन्ही अवस्थांमधील (जागृती, स्वप्न, सुषुप्ती) एकाच आत्मतत्त्वाची स्थिती, आत्म्याचे शाश्वत स्वरूप, जीवात्म्यास मायेने आच्छादित केलेले असणे, अज्ञान-अंधकार नष्ट झाल्यावर जीवात्मा-परमात्मा यांच्या एकत्वाचा बोध, दुधात असलेल्या लोण्याप्रमाणे चिंतन-मनन रूप मंथनाद्वारे परमात्मतत्त्वाची प्राप्ती आणि शेवटी स्व-स्वरूपात त्या परमात्मत्त्वाची अनुभूती हे या उपनिषदाचे वर्ण्य विषय आहेत.