अद्वैत वेदान्त (The principal of Un-individuality) हे हिंदू धर्माच्या सहा दर्शनांमधील एक दर्शन आणि तत्त्वज्ञान आहे. अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानात आत्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा विचार केला आहे. हे तत्त्वज्ञान मुळात उपनिषदांपासून सुरू झाले असले तरी आद्य शंकराचार्य हे त्याचे मुख्य प्रणेते मानले जातात.

एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे, जीवात्मा त्याहून भिन्न नाही व इतर सर्व विश्व मिथ्या आहे, असे प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञान म्हणजे केवलाद्वैतवाद होय. केवल म्हणजे निर्गुण हा अर्थ सांख्यदर्शनातील पुरुष तत्त्वाच्या केवल या विशेषणावरून घेतला आहे. सांख्यदर्शनात कैवल्य शब्द निस्त्रैगुण्य, मोक्ष या अर्थी वापरला आहे. म्हणून केवल म्हणजे मुक्त, नित्यमुक्त. अद्वैत हे विशेषण, द्रष्टा जो आत्मा त्याला बृहदारण्यक उपनिषदात (४·३·३२) प्रथम लावले आहे. द्वैत म्हणजे दोन किंवा एकापेक्षा अधिक. द्वैत म्हणजे द्रष्टा व दृश्य (बृहदारण्यक ४·५·५५). द्वैतविरहित ते अद्वैत. जीवात्मा व परमात्मा असा भेद म्हणजे द्वैत हा भेदही वस्तुतः नाही. त्याचप्रमाणे परमात्मा व जगत अथवा द्रष्टा व दृश्य असाही भेद वस्तुतः नाही. ब्रह्म म्हणजे परमात्मा, हेच एक सत्य आहे. तात्पर्य, जीवात्मा परमात्म्याहून वेगळा नाही आणि तोच एक सत्य असल्यामुळे दृश्य विश्व किंवा जगत हे आभासमय व मिथ्या आहे, असे अनुमान निष्पन्न होते.

केवलद्वैतवाद हा आद्य शंकराचार्य (७८८–८२०) यांनी विस्ताराने प्रतिपादिला. छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद यांमध्ये प्रथम तो आला आहे. त्याचप्रमाणे अथर्ववेदांतील चार ब्रह्मसूक्तांमध्येही त्याचे विशदीकरण केलेले दिसते. जगत किंवा दृश्य विश्व हे मिथ्या आहे, असे सांगणारा मायावाद बृहदारण्यक उपनिषदातील अद्वैताच्या विवरणावरून सूचित होतो, परंतु त्याचे स्पष्ट विवरण प्रथम शंकराचार्यांचे परमगुरू गौडपाद (सु. ७००) यांच्या मांडूक्य उपनिषदावरील कारिकांमध्ये आले आहे. मायावादासह केवलद्वैतवाद तपशीलवार विस्ताराने शंकराचार्यांच्या प्रस्थानत्रयीवरील भाष्यांमध्ये व संक्षेपाने त्यांच्या उपदेश साहस्त्रीत व दक्षिणामूर्तिस्तोत्रात आला आहे. शंकराचार्यांचे समकालीन मंडनमिश्र (नववे शतक) यांनी ब्रह्मसिद्धि या ग्रंथामध्येही तो विस्ताराने मांडला आहे. शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्यावर त्यांचे साक्षात शिष्य पद्मपादाचार्य (नववे शतक) यांची पंचपादिका ही टीका असून ती अपूर्ण आहे. याच टीकेवर प्रकाशात्मयीची विवरण (१२७८) नामक अत्यंत सुप्रसिद्ध टीका आहे. या भाष्यावरच वाचस्पतिमिश्रांची (सु. ८४१) भामती, त्यावर अमलानंदांची (सु. १२४७–६० च्या दरम्यान) कल्पतरु आणि त्यावर अप्पय्य दीक्षितांची (१५५४–१६२६) परिमल ही टीका आहे. अप्पय्या दीक्षितांचा सिद्धान्तलेशसंग्रह हा शांकरपरंपरेतील विविध मतभेदांचा सविस्तर संग्रह करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. शांकरभाष्यावर आनंदगिरी (सु. बारावे शतक) व अन्य पंडितांच्या इतरही अनेक टीका आहेत. शंकराचार्यांच्या तैत्तिरीय व बृहदारण्यक भाष्यांवर त्यांचे समकालीन सुरेश्वराचार्य यांचे ‘वार्तिक’ असून त्यांचा नैष्कर्म्यसिद्धि हा स्वतंत्र ग्रंथ आहे. नंतर विमुक्तात्मयती (८५० ते १०५० च्या दरम्यान) याची इष्टसिद्धी रामानुजाचार्य (सु. १०१७–११३७) यांनी शारीरकभाष्याच्या प्रथमसूत्र भाष्यातील मायावादाचा विस्तृत पूर्वपक्ष इष्टसिद्धीच्या आधारे मांडला आहे. सर्वज्ञात्ममुनींचा (सु. ९७८) संक्षेपशारीरक, श्रीहर्षाचा (सु. ११९०) खंडनखंडखाद्य, चित्‌सुखाचा (सु. १२००) तत्त्वप्रदीपिका, विद्यारण्य (१२९६–१३८६) याचे पंचदशी, विवरण प्रमेय संग्रह व जीवन्मुक्तिविवेक, धर्मराजाध्वरींद्र (सु. १५५०) याचा वेदान्तपरिभाषा, मधुसूदन सरस्वती (सु. १६५०) याचे अद्वैतसिद्धी, तत्त्वबिंदु, सदानंदाचा (सु. १६६४–सु. १७३०) वेदान्तसार इ. अनेक स्वतंत्र ग्रंथ शांकर वेदान्तावर आहेत. शंकराचार्यांना वेदान्त म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान हे प्राचीन भारताचे मुख्य तत्त्वज्ञान असल्यामुळे त्यावर संस्कृतमध्ये व भारताच्या मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू इ. भाषांमध्येही मध्ययुगात व आधुनिक काळात लहानमोठे अनेक ग्रंथ झाले आहेत.

ब्रह्म हेच एक सत्य तत्त्व आहे असे उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केले आहे. हे सिद्ध करीत असता या संदर्भात त्यांनी जीव व जगत त्याचप्रमाणे बंध व मोक्ष यांचा विचार मुख्यतः केला आहे. चार्वाक [→ लोकायत दर्शन] किंवा जडवादी नास्तिक यांच्या देहात्मवादी तत्त्वज्ञानाशिवाय इतर सर्व भारतीय तत्त्वज्ञाने मोक्षवादी आहेत. तसेच शांकरतत्त्वज्ञानही मोक्षवादी आहे. त्यात मोक्ष हे मुख्य ध्येय मानून तदनुसार इतर सर्व विचार मांडले आहेत. या तत्त्वज्ञानाचा म्हणजे ब्रह्मसाक्षात्काराचा अधिकारी मुमुक्षू होय.

मुमुक्षू म्हणजे मोक्षाचीच इच्छा असणारा. तो साधनसंपन्न म्हणजे ज्ञानास अधिकारी असला पाहिजे. त्याकरिता साधन चतुष्ट्य सांगितले आहे. ती चार साधने अशी : (१) नित्यानित्यवस्तुविवेक : नित्य वस्तू कोणती वा अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्ट समजणे.इहामूत्रफलभोगाविराग : ऐहिक व पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग म्हणजे अनिच्छा. (३) शमदमादिषट्कसंपत्ती : शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान व श्रद्धा यांची प्राप्ती. (४) मुमुक्षुत्व: म्हणजे संसारबंधातून मुक्त होण्याची दृढ इच्छा. संसार म्हणजे अनादी कालापासून चालत आलेली, जीवाला भोगावयास लागणारी सुखदुःखे, त्यांचे कारण धर्माधर्मरूप कर्मबंध व त्याला कारण असलेली जन्ममरणपरंपरा.

ब्रह्म म्हणजे काय ? ब्रह्माचे लक्षण काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे : ब्रह्माची लक्षणे दोन : एक स्वरूप लक्षण व दुसरे तटस्थ लक्षण. ब्रह्माचे स्वरूप वाचक शब्दाने (गीताभाष्य १३·१२) सांगता येत नाही. वाचक शब्द म्हणजे अभिधा या वृत्तीने अर्थबोध करून देणारा शब्द. लक्षणा ही शब्दाची एक वृत्ती ती अभिधा वृत्तीने बोधित होणाऱ्या अर्थातील काही भाग गाळू शकते, अधिक अर्थाची भर टाकू शकते किंवा निराळा अर्थ सांगू शकते. ब्रह्म हे शब्दांनी लक्षितच म्हणजे सूचित होऊ शकते. कारण कोणत्याही वाचक शब्दाच्या वाच्यार्थामध्ये धर्म आणि धर्मी म्हणजे जाती व व्यक्ती, गुण व गुणी, क्रिया व क्रियावान यांचा म्हणजे द्वैताचा एकत्र निर्देश असतो. उदा., ‘हा अश्व श्वेत व शीघ्रग आहे’, या वाक्यात हा म्हणजे सांनिध्य असलेली व्यक्ती, अश्व म्हणजे अश्वत्व जाती असलेली व्यक्ती, श्वेत म्हणजे श्वेत हा रंग किंवा गुण असलेली व्यक्ती व शीघ्रग म्हणजे गती त्वरित असलेली व्यक्ती, असा अर्थ होतो. असा धर्म व धर्मी मिळून वाच्यार्थ होतो. त्यामुळे वाच्यार्थ द्वैतरूप होतो. ब्रह्म म्हणजे वाच्यार्थाने महान किंवा सर्वव्यापक म्हणजे अनंत. महत्‌त्व, व्यापकता किंवा अनंतत्व हा धर्म असलेली व्यक्ती असा वाच्यार्थ होतो. परंतु ब्रह्म ह्या शब्दाने धर्म आणि धर्मी हा भेद वगळून शुद्ध ब्रह्म वस्तूच लक्षित म्हणजे सूचित होते. सत्, चित् व आनंद हे ब्रह्माचे स्वरूप लक्षण उपनिषदांत सांगितले आहे. सत् म्हणजे सत्तावान धर्मी, चित् म्हणजे चैतन्यवान धर्मी व आनंद म्हणजे आनंदत्व धर्म असलेला धर्मी असा अर्थ न करता सत्, चितं व आनंद असा धर्मरहित धर्मीचा लक्षणेने बोध होतो. त्याचप्रमाणे सत्, चित् व आनंद या तिन्ही शब्दांनी मिळून अखंड एकच स्वरूप बोधित होतो. सत् म्हणजे असत् (पृथिवी इ. अनित्य) नव्हे ते, चित् म्हणजे अचित् (पृथिवी इ. जड) नव्हे ते व आनंद म्हणजे अनानंद (पृथिवी इ. संयोगवियोगी) नव्हे ते. तात्पर्य, अन्यापोहाने म्हणजे अन्यधर्म नाकारून ब्रह्माचा बोध होऊ शकतो (गीताभाष्य १३·२१ इ.) सत्ताच चैतन्य व चैतन्यच आनंद यांच्यात फरक नाही. चैत्यन्याचेच पर्याय बोध, ज्ञान, प्रज्ञा, प्रकाश, प्रमाण, प्रमा, उपलब्धी हे होत. सत्ता, बोध वा आनंद एकच असून ते ब्रह्माचे स्वरूप होय (ब्रह्मसूत्रशांकरभाष्य ३·१·२१ ३·५४) ‘ब्रह्म वेदं सर्वम्’ (मुंडक २·२·११), ‘इदं सर्वं यदयमात्मा’ (बृहदारण्यक २·४·६), हे सर्व ब्रह्म आहे, हे सर्व म्हणजे हा आत्मा आहे अशा तऱ्हेची उपनिषदांतील वाक्ये हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे असे सांगून विश्वाचे सत्यत्व गृहीत धरून अद्वैत प्रतिपादितात. त्यामुळे अद्वैत पूर्णपणे सिद्ध होत नाही. म्हणून पूर्ण अद्वैत सिद्ध करण्याकरिता अशी वाक्ये विश्वाचे मिथ्यात्व म्हणजे खोटेपणादर्शक होत असे सिद्ध केले आहे ती विश्वबाधदर्शक मानली आहेत. अशी वाक्ये व्यवहारातही असतात. उदा., ‘मला दिसलेले रजत हे शुक्ती आहे’, ‘मला दिसलेला सर्प रज्जू आहे’ अशा वाक्यांचा रजत म्हणून जे वाटले ते रजत नाही तर शुक्ती आहे किंवा सर्प म्हणून जो भास झाला तो सर्प नसून ती रज्जूच आहे असा व्यवहारात अर्थ होतो. त्याचप्रमाणे जे हे सर्व विश्व ते विश्व नसून ते ब्रह्म किंवा आत्माच आहे, असा वरील उपनिषदांतील वाक्यांचा अर्थ होतो. असा अर्थ होतो याचे कारण ‘नेति नेति’, ‘नेह नानास्ति किंचन’, ‘अस्थूलमनणु’ इ. उपनिषदांतील वाक्यांनी ‘ते ब्रह्म व्यक्त नाही वा अव्यक्त नाही’, ‘ह्या जगात नानात्व नाही’, ‘ते ब्रह्म स्थूल नाही, अणू नाही’, असे म्हणून दृश्य विश्वाची सत्ता नाकारली आहे. अनंत प्रकारचे विश्व ब्रह्मरूप सांगून जसे नाकारले तसे अनंत जीवही नाकारले आहेत उदा., ‘तत्त्वमसि’ –तेच तू आहेस, ‘अहं ब्रह्माऽस्मि’–मी ब्रह्म आहे, ही वाक्ये पहा. या वाक्यांमध्ये जीवत्व नाकारून ब्रह्माशी त्याचे ऐक्य दाखविले आहे. जीवत्व हा त्याचा धर्म मिथ्या आहे परंतु त्याचे चैतन्य हे रूप सत्य आहे असा अशा वाक्यांचा भावार्थ होय. चैतन्य म्हणजेच आत्मा व आत्मा हाच परमात्मा होय. शंकराचार्यांनी नित्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त हे ब्रह्माचे स्वरूप लक्षण म्हणून वारंवार निर्दिष्ट केले आहे. हा त्यांनी उपनिषदांचा निष्कर्ष काढला आहे. या चार पदांचा अखंड एकच ब्रह्मवस्तू हा अर्थ आहे. नित्य म्हणजे आद्यंतरहित किंवा अमर शुद्ध म्हणजे निर्विकार व निर्दोष नित्य व शुद्ध या दोन शब्दांनी मिळून कूटस्थ नित्य असा अर्थ होतो. त्रिगुणात्मक प्रकृती नित्य आहे, परंतु निर्विकार व निर्दोष नाही. तिच्यात सतत विकार उत्पन्न होतो ती बदलत असते. दुःखमोहजडत्वादी दोष तिच्यात आहेत, ती अचेतन आहे तसे ब्रह्म नाही. कूटस्थ म्हणजे निर्विकार, अर्थात शुद्ध बुद्ध म्हणजे बोधरूप मुक्त म्हणजे मोक्षरूप. म्हणजे त्याच्यात अज्ञान नाही अज्ञान हाच बंध, तो बंध त्याला केव्हाच नाही. अनंत हेही विशेषण ब्रह्माच्या स्वरूपाचेच सूचक आहे. देश व काल किंवा अन्य वस्तूने मर्यादित असे नसलेले, असा अनंत या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी केला आहे (तैत्तिरीय उपनिषद्‍भाष्य). देश, काल व अन्य वस्तू हे अविद्येने आरोपित असे मिथ्या पदार्थ आहेत. त्यांची मर्यादा ब्रह्माला लागू नाही.

ब्रह्माचे दुसरे तटस्थ लक्षण होय. ‘कावळा बसला आहे, ते देवदत्ताचे घर होय’ या वाक्यात देवदत्ताच्या घराची माहिती कावळा या पदार्थाने मिळते. देवदत्ताच्या घराचे स्वरूप त्या शब्दाने कळत नाही किंवा ‘त्या झाडाच्या शाखेवर अरुंधती हा तारा आहे’ या वाक्यात अरुंधती तारा शाखेने दाखविला आहे. अरुंधतीच्या स्वरूपाशी शाखेचा काहीही संबंध नाही. घराचे कावळा वा अरुंधतीचे शाखा हे तटस्थ लक्षण आहे. ब्रह्माचे एक प्रसिद्ध तटस्थ लक्षण तैत्तिरीय उपनिषदात सांगितले आहे. ‘ज्याच्यापासून ही अस्तित्वात असलेली भूते म्हणजे प्राणिमात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये जगतात व ज्याच्यामध्ये प्रवेश करून लय पावतात, ते ब्रह्म होय.’ जगाची उत्पत्ती, स्थिती व लय ब्रह्मापासून, आत्म्यापासून किंवा ईश्वरापासून होते, असे सांगणारी वाक्ये उपनिषदांमध्ये पुष्कळ आहेत, ही वाक्ये ब्रह्माचे तटस्थ लक्षण सांगतात. विश्वाचे ब्रह्म हे उपादान कारण किंवा कर्ता आहे, विश्वाचे धारक तत्त्व आहे इ. अर्थाची वाक्ये ब्रह्माचे तटस्थ लक्षण सांगतात.

ब्रह्म हे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या मायाशक्तीच्या द्वारा विश्वाच्या उत्पत्तिस्थितिलयांचे कारण बनते. परंतु ती मायाशक्तीच मिथ्या असल्यामुळे तिच्या योगाने येणारे कर्तृत्व किंवा कारणत्वसुद्धा मिथ्याच होय. म्हणून कर्तृत्व वा कारणत्वदर्शक वाक्ये ब्रह्माचे स्वरूप लक्षण सांगत नाहीत, तटस्थ लक्षण सांगतात, असा अभिप्राय आहे.

ब्रह्माचे अस्तित्व सिद्ध करणारी मुख्य दोनच प्रमाणे होतः स्वतः ब्रह्म व श्रुती. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशी सहा प्रमाणे शांकरवेदान्ताच्या संप्रदायाने मान्य केली आहेत. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यांमध्ये प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीनच प्रमाणांचा प्रत्यक्ष निर्देश केला असून क्वचित ‘अनुमानादीना’ असा निर्देश आहे अशा ठिकाणी ‘आदी’ शब्दाने इतर म्हणजे उपमान, अर्थापत्ती व अनुपलब्धी यांचे सूचन केले आहे. अनेक ठिकाणी अर्थापत्तीचा निर्देश केला आहे. परंतु तिला तेथे तर्क वा अनुमान असेही म्हटले आहे. प्रमाणसंख्येच्या बाबतीत शंकराचार्यांचा आग्रह दिसत नाही. प्रत्यक्ष, अनुमान व शब्द ही तीनच प्रमाणे त्यांना सांख्यांप्रमाणे महत्त्वाची वाटतात, असे वारंवार या तीन प्रमाणांचाच निर्देश केल्यावरून दिसते.

(१) ब्रह्म हाच आत्मा, आत्मा हा स्वयंसिद्ध अनुभव आहे. तो स्वतःच स्वतःचे प्रमाण आहे. जगातील इतर सर्व आकाश, वायू इ. पदार्थांच्या अस्तित्वाला प्रमाण असल्यावाचून त्यांचे अस्तित्व सिद्ध होत नसते. आत्म्याच्या स्वतःच्या अस्तित्वाला प्रमाणांची आवश्यकता नसते तो स्वयंसिद्ध आहे. प्रमाण, प्रमेय इ. व्यवहारांचा तो आश्रय असल्यामुळे तो तत्पूर्वसिद्ध आहे (ब्रह्मसूत्रशांकरभाष्य २·३·७). म्हणजे असे, की आत्म्याला इतर वस्तूंच्या सिद्धीकरिता प्रमाणांचा उपयोग करावा लागतो. प्रत्यक्षादी प्रमाणे असिद्ध असलेल्या प्रमेयाच्या सिद्धीकरिता आत्म्याकडून उपयोगात आणली जातात. आत्मा हा प्रमाण, प्रमेय इ. व्यवहारांचा आधार असल्यामुळे त्या व्यवहारांच्या अगोदरच तो सिद्ध आहे.

(२) त्याचे निराकरण म्हणजे नकार संभवत नाही. आगंतुक वस्तूचे निराकरण करता येते, स्वरूपाचे नाही. कारण निराकरण करणारा, नाकारणारा असल्याशिवाय निराकरण होऊ शकत नाही. निराकरण करणारा म्हणजेच आत्मा.

(३) ब्रह्म हे ज्ञान वा उपलब्धी होय. ज्ञानानेच वस्तूची सिद्धी होते. (अ) ब्रह्म हे स्वतःचेच ज्ञान होय. तो साक्षात अपरोक्ष आहे, असे बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे. इंद्रिये व मन यांच्या मध्यस्थीने नाम व रूपे वा रूप, रस इ. विषयांची सिद्धी होते, तशी त्यांची मध्यस्थी आत्म्याच्या सिद्धीला आवश्यक नसते. इंद्रिये व मन यांची मध्यस्थी बाह्य विषयांच्या प्रत्यक्षात असते, तशी आत्मप्रत्यक्षात नसते म्हणून तो साक्षात अपरोक्ष होय. (आ) आणखी असे, की बाह्य अनात्म विषयांची सिद्धी आत्म्यामुळे होते. आत्मा हा सर्वांचा प्रकाश आहे. अध्यास़़.