अतिमानस (Supermind) - श्रीअरविंद आणि श्रीमाताजीप्रणीत पूर्णयोगामध्ये या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे.

अतिमानसाची अन्य नावे संपादन

विज्ञान, ऋतचित् (Truth Consciousness), सत्य-कल्पना, सत्य-संकल्प, सत्य-ज्ञान [१]

इंग्रजीत अतिमानसाला Supermind असे संबोधले जाते.

तुरीयम धाम, तुरीयम स्विद = अस्तित्वाची चौथी अवस्था असे विज्ञानाला प्राचीन वैदिक शब्द आहेत.[२]

अतिमानस संकल्पनेचे प्रणेते संपादन

मानव हा उत्क्रांतीमधील अंतिम टप्पा नसून, येथून पुढेही वाटचाल चालू राहणार आहे, मानव हा संक्रमणशील जीव आहे, अशी मांडणी योगी श्रीअरविंद यांनी केली. उत्क्रांतीच्या पुढील वाटचालीचे टप्पेदेखील त्यांनी सांगितले आहेत. आज मनुष्य मनोमय पुरुष आहे त्याची वाटचाल अतिमानसाकडे चालू आहे, असे ते म्हणतात. अतिमानस हे मनाच्या कक्षेच्या पलीकडे आहे.

पाहा : चेतनेची उत्क्रांती

अतिमानसाचे स्थान संपादन

अतिमानसाच्या वर सच्चिदानंद आहे. अतिमानसाच्या खाली अधिमानस, त्याखाली अंतर्ज्ञानात्मक मन, प्रदीप्त मन, उच्च मन व सामान्य मन अशा उतरत्या क्रमाच्या पातळ्या आहेत. त्या सर्व पातळ्या निम्न गोलार्धात म्हणजे अज्ञानाच्या कक्षेत येतात. अतिमानस ऊर्ध्व गोलार्धात असते.

पाहा - चेतनेची उत्क्रांती

चौथा क्रमांक संपादन

वैदिक ऋषींच्या भाषेत अनंत अस्तित्व (सत), अनंत ज्ञान (चित), अनंत आनंद ही अनाम ब्रह्माची तीन सर्वश्रेष्ठ नामे आहेत आणि विज्ञान (अतिमानस) हे चौथे नाम आहे. अस्तित्वाच्या जड शरीर, प्राण व मन या श्रेणीचा विचार करतानासुद्धा विज्ञानाचा क्रमांक चौथा येतो. [२]

अस्तित्वाच्या श्रेणी
सत
चित
आनंद
ऊर्ध्व गोलार्ध (परार्ध)  
विज्ञान
निम्न गोलार्ध (अपरार्ध)  
मन
प्राण
जड शरीर

अतिमानसाचे स्वरूप संपादन

अतिमानस पूर्ण ज्ञानाने झळाळत असते. ते सच्चिदानंदाचे गतिशील, सर्जक व स्वयंविस्तारित अंग आहे.

अतिमानसाची आवश्यकता संपादन

श्रीअरविंद म्हणतात, सच्चिदानंदाचा स्थितीशील साक्षात्कार हा मन, प्राण आणि शरीर यांना (कनिष्ठ प्रकृतीला) आधार पुरवू शकतो, पण त्यातून कनिष्ठ प्रकृतीचे रूपांतरण घडून येत नाही. ते रूपांतरण होण्यासाठी म्हणजे तिचे परा-प्रकृतीमध्ये किंवा दिव्य-प्रकृतीमध्ये रूपांतरण होण्यासाठी अतिमानसाची आवश्यकता असते.[३]

अतिमानसाचे अवतरण संपादन

२९ फेब्रुवारी १९५६ रोजी पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसाचे अवतरण झाले आहे याची उद्घोषणा श्रीमाताजी यांनी २४ एप्रिल १९५६ रोजी केली. पृथ्वीवरील ‘अतिमानसा’चे आविष्करण हे आता केवळ अभिवचन उरलेले नाही, तर ते एक जिवंत वास्तव आहे, ती वस्तुस्थिती आहे, या शब्दांमध्ये तो संदेश देण्यात आला.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ श्रीअरविंद (१९६०). दिव्य जीवन (खंड पहिला). पाँडिचेरी: श्रीअरविंद आश्रम. pp. ४९०. ISBN 81-7058-618-6.
  2. ^ a b श्रीअरविंद (१९६०). दिव्य जीवन (खंड पहिला). पाँडिचेरी: श्रीअरविंद आश्रम. pp. ५००. ISBN 81-7058-618-6.
  3. ^ Sri Aurobindo (2012). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 28. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 133.
  4. ^ Collected works of the Mother, Vol 15. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. 1980. ISBN 81-7058-670-4.

०१) श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन, ले. डॉ.गजानन नारायण जोशी, पुणे विद्यापीठ, प्रकाशन वर्ष १९८२

०२) पृथ्वीवर अतिमानासाचा आविष्कर, ले.श्रीअरविंद घोष, अनुवादक - सेनापती बापट, १९६५, प्रकाशक - श्रीअरविंद आश्रम