सेंबावांग न्यू टाउन
एकूण क्षेत्रफळ: ७.०८ कि.मी.²
निवासी क्षेत्रफळ: ३.७६ कि.मी.²
निवासस्थानांची संख्या: १७,८७४
भविष्यातील कमाल घरे: ६४,०००
लोकसंख्या: ५८,७००

सेंबावांग हा सिंगापुरातील सर्वात उत्तरेकडच्या सेंबावांग गट प्रतिनिधित्व मतदारसंघातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा विभाग आहे.
अलीकडच्या काळात निवासी बांधकामांमध्ये वाढ झाल्याने सेंबावांगाला जरी उपनगरी स्वरूप प्राप्त झाले असले तरीही वसाहतकाळापासून या भागात सैनिकी, औद्योगिक महत्त्वाची केंद्रे वसलेली आहेत. इ.स.च्या २० व्या शतकापासून इथे नाविक तळ आणि व्यापारी बंदर असून आजदेखील येथून नियमित जलवाहतूक होते.

सेंबावांग गट प्रतिनिधित्व मतदारसंघाचा नकाशा.

नावाची व्युत्पत्ती संपादन

सेंबावांगाचा ऐतिहासिक उल्लेख सर्वप्रथमतः फ्रँक्लिन आणि जॅक्सन यांच्या १८३० सालच्या सिंगापुराच्या नकाशात तांबुवांग नदीच्या संदर्भाने येतो. या परिसराला हे नाव त्या काळात इथे विपुल प्रमाणात असलेल्या 'सेंबावांग' वृक्षापासून मिळाले. सेंबावांग पार्कात आजही या जातीचा वृक्ष आहे.

इतिहास संपादन

इसवी सनाच्या २० व्या शतकात हा भाग नी सून रबर इस्टेटीचा भाग होता. वसाहतकाळात ब्रिटिशांनी इथे आरमारी तळ उभारला. १९२८ साली आरंभलेले आरमारी तळाचे बांधकाम १९३८ साली पुरे झाले. गोदी, व्हार्फ इत्यादी नाविक बांधकामांखेरीज गरजेनुसार प्रशासकीय, व्यापारी आणि निवासी बांधकामेही यात अंतर्भूत होती. सिंगापुराच्या स्वातंत्र्यानंतर हा आरमारी तळ सिंगापूर शासनाच्या ताब्यात आला. शासकीय पुढाकाराने १९६८ साली जुन्या आरमारी तळाचे व्यापारी नाविक तळामध्ये रूपांतर केले गेले.