सहकारी मनोरंजन मंडळ ही परळ येथील एक नाट्यसंस्था आहे'

सन १९२० च्या काळात परळ-पोयबावाडी ह्या भागात माडांच्या वाड्या, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, तमाशाची थिएटरे होती. यांच्या विळख्यात बहुजन समाज गुरफटून गेला होता. दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवन सुखी होण्यासाठी जिवाला काहीतरी करमणूक पाहिजे होती. ती ज्या दर्जाची असेल त्याप्रमाणे समाजाची वृत्ती बनत असते. करमणुकीची पातळी जेवढी उच्च तेवढी समाजाची पातळी उच्च. याच दृष्टीिनातून परळ भागात एखादी चांगली नाट्यसंस्था स्थापन करून या संस्थेद्वारे कामगारांचे जनतेचे चांगल्या प्रकारे मनोरंजन, प्रबोधन करून त्यांची अभिरुची बदलण्याचा प्रयत्न करावा असे कामगार नेते कै. ना.म. जोशी यांच्या मनात होते.

याच काळात गिरगावांत राष्ट्रभूषण नाटक कंपनी होती. त्या संस्थेत गंगाराम कदम भूमिका करत असत. शिवाय 'हिंद सेवक नाट्य समाज' या नावाची एक संस्था होती. या संस्थेत शिवाजी पाटकर, द्वारकानाथ पाटील, दाजी मसुरकर, पाडावे, इत्यादी नट भूमिका करीत असत. या सर्वांच्या सहकार्याने संघाने, करीमभाई मिलमध्ये कच्ची रंगभूमी उभारण्यात आली होती व तेथे नाटके होऊ लागली होती.

'करीमभाई मिलच्या रंगभूमी'वर होत असलेल्या नाटकांमुळे ना.म. जोशी यांचा नटांशी संबंध येऊ लागला. त्यांना संघाचे इतर कार्यकर्ते पु. गो. नाईक, सहस्रबुद्धे, चित्रे, फासे, बडे, काणेकर, फणसे, यांचे सहकार्य मिळाले. या सर्व गोष्टींचा समन्वय घडून, जेव्हा परळमध्ये दामोदर हॉल बांधला गेला, त्यासुमारास दि. २० सप्टेंबर १९२२ रोजी त्या हाॅलमध्ये सहकारी मनोरंजन मंडळ स्थापन झाले. दामोदर हॉलसारखी भव्य जागा विनाभाड्याने बाराही महिने वापरण्यास मिळू लागली व कामाला सुरुवात झाली. करीमभाई रंगभूमीवरील दुसरे नट दाजिबा परब हेही 'सहकारी मनोरंजन'मध्ये सामील झाले.

अप्पा टिपणीस यांच्या 'राधा माधव' या नाटकाने सुरुवात झाली. शिवाजी पाटकर यांनी तालीम मास्तर म्हणून काम पाहिले. विविध संस्थांच्या मदतीसाठी नाटकांचे प्रयोग केले. सहकारी तत्त्वामुळे कोणालाही मोबदला मिळत नसे, हिंद सेवक मंडळाचे सर्व नट सहकारीमध्ये सामील झाल्यामुळे त्या मंडळाच्या सामानाची किंमत ठरवून ती रक्कम ह्या सभासदांच्या भागापोटी जमा करण्यात आली.

पंजीकरण संपादन

प्रसिद्ध कामगार नेते ना . म . जोशी यांनी कै. गंगाराम बाबाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा संघाला पूरक अशा सहकारी मनोरंजन मंडळाची दि . २० सप्टेंबर १ ९ २२ रोजी स्थापना केली

दिनांक ३० नोव्हेंबर १९२५ रोजी सहकारी मनोरंजन मंडळ सहकारी तत्त्वावर रजिस्टर करण्यात आले.

पहिले व्यवस्थापक मंडळ संपादन

  1. जी. एन सहस्रबुद्धे ( कार्यध्यक्ष )
  2. जी. बी कदम
  3. पु. गो. काणेकर
  4. चित्रे, (५) जाधव, (६) मालणकर, (७) गाडे, (८) परब, (९) पाटकर, (१०) नागवेकर, (११) पाटील, (१२) वरळीकर , (१३) भोसले, (१४) दादरकर, (१५) हि.त. राजोपाध्याय

कै. आप्पासाहेब टिपणीसांच्या ‘संगीत राधामाधव’ या नाटकाने मंडळाची नाट्यसेवा सुरू झाली. इतरत्र गाजलेल्या त्राटिका, मत्स्यगंधा, पुण्यप्रभाव, भावबंधन, शारदा , संशयकल्लोळ, हाच मुलाचा बाप,सौभद्र, सावित्री इ. असंख्य नाटकांबरोबरच कै. गं . ब . कदम यांचे प्रचंड गाजलेले नाटक ‘ ललाटलेख ‘, कै. दाजीबा परब यांचे ‘ गिरणगावात ‘ ही मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची नाटकं, तसेच मामा वरेरकरांचे ‘ द्वारकेचा राजा ‘ , रा बा गावडे लिखित ‘अशी होती मराठी माणसं’ इ. खास मंडळाकरिता लिहिलेल्या नाटकांचे प्रयोगही यशस्वीरित्या केले गेले. या काळात संस्थेने राधामाधव, मत्स्यगंधा, चंद्रग्रहण, त्राटिका, संशयकल्लोळ, भावबंधन, पुण्यप्रभाव, हाच मुलाचा बाप, तुकाराम, दामाजी, व सावित्री ही नाटके सादर केली.

सन १९२६-२७ साली मंडळाने सर वेस्ली विल्सन हॉस्पिटल फंडास नाटकाच्या उत्पन्नातून मदत केली. त्याबद्दल मुंबईच्या गव्हर्नरांचे हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक मिळाले. इतर संस्थांकडून व जनतेकडून वाहवा मिळाली व आणखी पदके मिळाली. त्यावेळी एकूण बारा पदके सहकारी मनोरंजन मंडळाला मिळाली.

ल. ग. सुळे लिखित ‘लग्नसोहळा’ या नाटकापासून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पुरस्कार मंडळाने सुरू केला. नटवर्य नानासाहेब फाटक, मा . दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, राजाराम शिंदे, बाबासाहेब नाईक, मनोहर चव्हाण, अनंत दामले, शंकर घाणेकर, श्री. जोगळेकर, किशोरी पाठक, सौ. ललिता पेंढारकर, शालिनी भालेकर, सुमन मराठे, जयश्री शेजवाडकर, कुसूम चव्हाण असे असंख्य कलाकार वसंत शेणई, बाळ पवार सारखे दिग्दर्शक, नट, पार्वती कुमार सारखे नृत्यदिग्दर्शक हे मंडळाचे सभासद मराठी रंगभूमीवर गाजले व त्यांनी मंडळाचे सभासदत्व अभिमानाने मिरविले.

१९३५ पर्यंत गंधर्वयुगाचा प्रभाव मराठी रंगभूमीवर होता . त्यानंतर चित्रपटाच्या आक्रमणाने मोठमोठे नाट्यदिग्गज उन्मळून पडले, अशा उतरत्या कालखंडात १९६० पर्यंत कामगार रंगभूमीने मराठी रंगभूमीला तगवले, जगवले व वर्धिष्णू ठेवले व त्यात सहकारी मनोरंजन मंडळाचा वाटा सिंहाचा होता. नुसती नाटकेच करून मंडळ थांबले नाही, तर अत्यल्प मोबदल्यात आपदस्तांना, दुष्काळ पीडितांना व नाट्यसंस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत केली.

सध्या सुरू असलेल्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाच्या निम्मिताने हे मंडळ पुन्हा चर्चेच्या झोतात आले आहे.