व्लादिमिर लेनिन

रशियाचे क्रांतिकारी नेते व विचारवंत
(व्लादिमिर इलिच लेनिन या पानावरून पुनर्निर्देशित)

व्लादिमिर इलिच लेनिन (इस.१८७०-१९२४) हे रशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. रशियन राज्यक्रांतीनंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे. लेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे.

व्लादिमिर लेनिन
साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

जीवन संपादन

व्होल्गा नदी किनाऱ्यावरील सिम्बिर्स्क (नंतरचे उल्यानोव्हक) या गावी लेनिनचा जन्म एप्रिल २२ १८७० रोजी झाला. त्यांचे वडील इल्या निकोलायेव्ह उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्झांड्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडांतील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब हे सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून ओळखले जाई. इल्या निकोलायेव्हिच यांना खूप मान होता, तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरामात व उदार वातावरणात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. १८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७ मध्ये त्सार (मराठीत झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण ॲना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला.

शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशीच्या विरोधात केलेल्या निदर्शनांमुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.

समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. तर दुसरीकडे लेनिन यांच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची मुभा लेनिन यांना देण्यात आली. चार वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करीत लेनिन ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने युरोपमध्ये इतरत्र राहिले. १८९३ पासून त्यांनी लेख लिहिण्यास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होऊ लागले. १८९५ मध्ये लेनिन रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांनी ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी लेनिन यांना अटक केली. लेनिनवर राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना १८९७ साली सायबेरियात तीन वर्षांची शिक्षा भोगण्यास पाठविण्यात आले. त्याकाळी सायबेरियाची शिक्षा जुलमाची नव्हती. लेनिन यांनी या काळात भरपूर वाचन, लेखन, अन्य कैद्यांशी चर्चा करण्यात घालविला. १८९८ साली लेनिन यांची जुनी सहकारी नादेझ्दा कृपस्काया (Nadezhda Krupskaya) हिलाही सायबेरियात शिक्षा म्हणून पाठविण्यात आले. लेनिन यांनी नादेझ्दाशी तेथेच विवाह केला. सायबेरियात असतांनाच लेनिन यांनी रशियातील भांडवलशाहीचा विकास नावाचा ग्रंथ लिहिला.

शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी रशियाबाहेर राहण्याचे ठरविले. रशियाच्या बाहेर राहून एखादे वृत्तपत्र काढून त्याचे वाटप गुप्तपणे व प्राभावीपणे व्हावे असे लेनिन यांना वाटत होते. त्याप्रमाणे डिसेंबर १९०० मध्ये सुप्रसिद्ध इस्क्रा (रशियन ठिणगी) नावाचे नियतकालिक लेनिन यांनी सुरू केले. यामुळे समाजवादी गटात लेनिनचे महत्त्व वाढतच गेले. मार्क्सवादाला जोड देत आणि त्यात सुधारणा करत लेनिन यांनी लेनिनवादावर पुस्तक लिहिले.

१९०३ साली रशियन सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे दुसरे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात लेनिन आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील ज्येष्ठ नेते प्लेखानोव्ह, मार्तोव्ह यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे पक्षात फूट पडली. लेनिन यांना पाठिंबा देणारे बहुमतवाले बोल्शेव्हिक तर उरलेले अल्पमतवाले मेन्शेव्हिक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हा आपला पक्ष कडक शिस्तीने चालवावा असे आदेश लेनिन यांनी आपल्या पाठिराख्यांना दिले.

१९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी झारने 'ऑक्टोबर घोषणा' करून जनतेच्या काही मागण्यांना मान्यता दिली. लेनिनसारख्या नेत्यांना रशियात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी १९०६ साली पुन्हा रशिया सोडले. १९०६ ते एप्रिल १९१७ या काळात लेनिन रशियाबाहेरच राहिले. १९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते.

मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, झाररला संपविले. नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली.

लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबरमध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजूचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच जानेवारी २१ १९२४ या दिवशी लेनिन यांचे निधन झाले.

भारतीय दृष्टिकोनातून लेनिन संपादन

लेनिन केवळ एक परकीय शासक नसून देशांच्या सरहद्दी ओलांडून साम्यवादाचा विचार प्रत्यक्षात आणणारा आणि भगतसिंगांसारख्या तरुणांना आकर्षित करणारा, क्रांतीचा प्रणेता होता. जगभरातील शोषित कामगारांच्या लढ्याचे तो प्रेरणास्थान होता.

लेनिन हा रशियन क्रांतीचा प्रणेता असला तरी तो मध्यमवर्गीयांतून पुढे आलेला होता. मार्क्सच्या अर्थविषयक सिद्धान्ताचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात प्रशासनात आणणारा तो राज्यकर्ता होता.

त्याचा क्रांतीचा लढा, त्याची शासनव्यवस्था, लोकशाहीविषयी त्याचे मत हे सर्व बाजूला ठेवून त्याने रशियात १९२१ मध्ये आणलेला कामगार कायदा, सिव्हिल कोड त्यानुसार नोकरदार, कामगार आणि शेतमजूर यांचं केलेले वर्गीकरण आणि त्यासंबंधी केलेली नियमावली पुढे जगभरातील कामगार कायदे, वेतनाचे नियम, कामगारांचे इतर हक्क यासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले.

आज मध्यमवर्ग सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थेत काम करतो, त्या कामाचे ठरावीक तास असतात. याची नियमावली लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसनी दिलेल्या लढ्यानंतर जगभर ठरवली गेली त्यापेक्षा जास्त काम केले की हक्काने ओव्हरटाईम मिळतो, रहायला क्वार्टर्स मिळतात, किंवा घरमालकाला देण्यासाठी कंपनीकडून घरभाडे मिळते. प्रवासभत्ते, हक्काच्या सुट्या, मेडिकल ट्रीटमेंट हे सगळे लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी मिळवले आहे.

रिटायरमेंट बेनिफिट, ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत.

अनुकंपा तत्त्वावर मिळालेल्या नोकऱ्या आणि तसे नियम आणि करार हेसुद्धा याच कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे झालेले आहेत.

बँक, शिक्षक, प्राध्यापक, रेल्वे आणि सरकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा मोर्चा आजही लाल बावट्याच्या सावलीत निघतो. तो लाल बावटा लेनिनचा.

कोणताही भांडवलदार उद्योगपती आणि कोणतेही सरकार हे स्वतः होऊन स्वयंप्रेरणेने या गोष्टी करत नसते. हे सर्व लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी लढून मिळवले आहे. जगभर स्थापन झालेल्या कामगार संघटना, त्यांचे उद्देश, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे सरकार आणि इतर खाजगी उद्योगांशी होत असलेले करार याचा उद्गाता लेनिन होता.

काम्यनिस्टांच्या विरोधात असणाऱ्या भारतातील काँग्रेस सरकारने पण सकारात्मक विचार करून यांतील बरीशी धोरणे राबवली होती. वेळोवेळी त्यात सुधारणाही केलेली होती. पण सुस्थापित झाल्यावर मध्यमवर्गाला आता या सर्व गोष्टींची गरज उरली नाही. माहिती घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही.ना लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सचीना मध्यममार्गी काँग्रेसची. भारतात आता (२०१८ साली) फक्त मंदिरे, अध्यात्म, गौरवशाली संस्कृती वगैरे महत्त्वाच्या बाबी आहेत आणि डार्विन, आईनस्टाईन, न्यूटन हे भारतीय नाहीत म्हणून त्यांची 'ऐशी की तैशी' करणारे बुद्धिमान राज्यकर्ते आहेत.

अशा लेनिनचा भव्यापुतळा भारतातील त्रिपुरा राज्यातील बेलोनिया शहरातील उभारला होता. हा पुतळा ६ मार्च २०१८ रोजी भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी जेसीबीने उखडला आणि त्यांचे शीर वेगळे करून ते त्याचा फुटबॉल करून खेळले. त्यांच्या या कृत्याने लेनिन यांच्याबद्दलचा आदर आणि विश्‍वास तिळमात्रही कमी होणार नाही. उलट लेनिन जास्तीत जास्त देशवासीयांसमोर पोहोचतील, अशी शक्यता आहे. लेनिनला उखडून फेकले आणि या उन्मादाचे समर्थन केले तरी त्याआधी कामगारांचे फंड, भत्ते यांना पण काडी लावायला हवी होती, कारण ते लेनिनमुळेच मिळाले आहेत.

साम्यवाद
 

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस