महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ या गावी विसोवा नावाचे एक सद्गृहस्थ रहात होते. ते सोन्याचांदीचे काम करणारे सराफ होते. श्रीमंत तर होतेच, पण ईश्वरभक्त होते.

जेव्हा जेव्हा दुष्काळ पडत असते तेव्हा तेव्हा विसोबा सराफांच्या जवळ जे काही असेल ते दुष्काळपीड़ितांना वाटून देत. असे असूनही अनेक लोक भुकेने प्राण सोडत. विसोवांनी विचार केला की माझी एवढी पत आहे की मला कुणीही कर्ज देईल. का न कर्ज काढून भुकेल्यांचे पोट भरू? जेव्हा अकाल संपेल तेव्हा ते कर्ज फेडता येईल. त्यांच्या पत्नीलाही हा विचार पसंत पडला. विसोवांनी एका पठाणाकडून कर्ज घेतले, आणि त्यातून अन्न विकत घेऊन ते भुकेलेल्यांना वाटू लागले. कुणीतरी चुगली केली आणि पठाणाला विसोवा दिवाळखोर झाल्याची बातमी कळवली. पठाण बिथरला आणि त्याने विसोवा सराफांना सात दिवसाच्या आत कर्जाची परतफेड करायला सांगितले. मुसलमानी राजवटीत पठाणांचेच म्हणणॆे ऐकले जात असे, न्याय वगैरे काही नव्हता. विसोवा सराफांच्याकडे काहीच नव्हते, ते कुठून कर्ज फेडणार?

जेव्हा कर्ज चुकवण्याची काहीही व्यवस्था होऊ शकली नाही, तेव्हा पठाण विसोवा सराफांवर क्रूर अत्याचार करून त्यांना अपमानित करू लागला. विसोवांनी सर्व मुकाटपणे सहन केले. ते फक्त एवढेच सांगत की 'मी आपले कर्ज घेतले आहे, जेव्हा जमेल तेव्हा मी ते सव्याज फेडीन.'

विसोवा सराफांचे हाल पाहून विसोवांच्या मुनीमाने आपली सर्व स्थावर मालमत्ता विकून व जवळची सर्व पुंजी देऊन पठाणाचे कर्ज फेडले. त्यानंतर तो मुनीम विसोवा सराफांच्या साथीने परोपकार करू लागला आणि ईश्वर भक्तीत रममाण झाला.

महिपतबुवा ताहराबादकर यांनी विसोवा सराफांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे.