"पुष्पा पागधरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुष्पा पागधरे (माहेरच्या पुष्पा चामरे) या एक मराठी गायिका आहेत. प...
(काही फरक नाही)

२२:५८, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती

पुष्पा पागधरे (माहेरच्या पुष्पा चामरे) या एक मराठी गायिका आहेत.

पुष्पाताईंचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव सातपाटी. त्यांचे वडील जनार्दन आणि आई जानकी चामरे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. वडील भजने गायचे. मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पाताई वडिलांबरोबर भजनाच्या कार्यक्रमातून असायच्या. गाण्यासाठी सुरुवातीला शाळेतील आर. डी. बेंद्रे या शिक्षकांचे मार्गदर्शन पुष्पाताईंना मिळाले. बेंद्रे सरांना संगीताचे व गाण्याचे चांगले ज्ञान होते. पुष्पाताईंच्या कोळी समाजातील मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे ही दूरची गोष्ट होती. पण वडिलांमुळे बेंद्रे सरांकडे त्या गाणे शिकायला जाऊ लागल्या. बेंद्रे सरांनी त्यांना आवाज कसा लावायचा ते शिकविल; त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न घेता गाण्याचा रियाज करून घेतला.

मुंबईत आगमन

सातपाटीच्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई ‘जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला’ हे गाणे गायल्या. कार्यक्रमाला मुंबईचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर आले होते. गाणे ऐकून ते खूश झाले. त्यांनी पुष्पाताईंना मुंबईला यायला सांगितले. वडिलांबरोबर त्या मुंबईला संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे गेल्या. त्या वेळी आकाशवाणीवर बडे गुलाम अली खाँ, अख्तरी बेगम (बेगम अख्तर) यांच्या ठुमरी, गझल लागत असत. त्या सतत ऐकत असल्याने पुष्पाताईंना पाठ झाल्या होत्या. देसाई यांना त्यांनी त्या म्हणून दाखविल्या. त्यांना गाणे आवडले. त्यांनी पुष्पा पागधरे यांची अब्दुल रहेमान खाँसाहेब यांची भेट घडवून दिली.