"गणपतराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गणपतराव जोशी (जन्म : १५ ऑगस्ट, १८६७; मृत्यू : ७ सप्‍टेंबर, १९२२) हे एक...
(काही फरक नाही)

२३:०७, २२ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

गणपतराव जोशी (जन्म : १५ ऑगस्ट, १८६७; मृत्यू : ७ सप्‍टेंबर, १९२२) हे एक गद्य नाटकांत काम करणारे मराठी नट होते. मराठी संगीत नाटकांच्या भरभराटीच्या काळात केवळ गद्य नाटकांसाठी त्यांनी इ.स. १८८१ मध्ये शाहूनगरवासी नाटक मंडळी स्थापन केली.

गणपतराव जोशांनी शेक्सपियरच्या ऑथेल्लो, टेमिंग ऑफ द श्रू आणि हॅम्लेट या नाटकांतून भूमिका केल्या. मराठी हॅम्लेट (चंद्रसेन) नाटकातली त्यांची भूमिका विशेष गाजली.

गणपतराव जोशी यांच्या अभिनयाबद्दल श्री.म. माटे यांनी व्यक्त केलेले विचार

श्री.म. माटे (१८८६-१९५७) यांनी ‘चित्रपट : मी व मला दिसलेले जग’ या त्यांच्या पुस्तकात गणपतराव जोश्यांच्या अभिनयाचे यथार्थ विश्लेषण केले आहे. ते लिहितात- ‘एकदा कर्‍हाडला गेलो असताना तेथे गणपतराव जोशी यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकाच्या जाहिराती लागलेल्या पाहिल्या; आणि या नामांकित नटाचा तो प्रयोग मी तेथे पाहिला.. हॅम्लेट नाटकातील विचारांची तात्त्विक बैठक थोडी सूक्ष्मच आहे. परंतु मानवी प्रकृतीशीं सर्वथा एकजीव होणार्‍या या महानुभाव नटाने हें नाटक इतके सुंदर वठविलें, कीं तेथें ते लागतांच मागासलेले श्रोतेही केवळ हर्षभरित होऊन गेले. मानव्याचें गूढस्थ आवाहन कोणालाही पोंचतें, फक्त पोंचविणारा असला पाहिजे असें त्यावेळी दिसून आलें. गणपतरावांसारखा नट पाहावयास मिळाला हेंही मी माझे भाग्य समजतों. आधुनिक महाराष्ट्रांत आजवर जी अव्वल दर्जाची माणसें होऊन गेली आहेत, त्यांतच या थोर नटाची गणना केली पाहिजे.. गणपतराव जोशी यांची मूर्ती साधारणपणें ठेंगणी, पण मोठी सुबक होती. थोडासा ऐटबाज वेश केला, कीं हें पात्र प्रत्यक्ष राजालासुद्धां हेवा वाटावा असें झोंकदार दिसे.. गणपतराव पायानें किंचित अधू आहेत, असें माझ्या एका जुन्या मित्रानें मला सांगितलें होतें.. पण हें असलें वैगुण्य ते इतक्या सफाईनें झाकून टाकीत, कीं माहीत असल्याशिवाय तें कोणालाही कळू नये. नटश्रेष्ठ असें नांव आपण अनेकांना देतों. पण महाराष्ट्रातला खरा श्रेष्ठ नट म्हणजे गणपतराव जोशी होते. नाटक पहात असतानां असें कित्येकदां वाटे कीं स्टेजवर दिसत असलेल्या विचारांच्या बारीक बारीक छटा खुद्द नाटककाराच्या मनांत तरी होत्या ना? गणपतरावांचा आवाज उंच, खडा, पल्लेदार, पण अत्यंत मधुर असे. त्याला कधी खर आली नाही कीं त्याच्या चिरफाळ्या झाल्या नाहींत.. मनाचा खरा मोठेपणा असल्याशिवाय अभिनयसुद्धां चांगला करतां येणार नाहीं. थिल्लरपणा, माकडचेष्टा, हातवार्‍यांचे फेरे, कानठळ्या बसविणारे आवाज, खेंच-खेचून घेतलेल्या आवाजाची मोडणी.. या सर्वाची पुष्कळदां अभिनयांत गणना होते. पण गणपतराव असल्या उपाधींपासून सर्वथा अलिप्त होते.’’

गणपतराव जोशी यांची नाटके आणि त्यांतल्या त्यांच्या भूमिका

  • ऑथेल्लो (झुंझारराव)
  • त्राटिका (प्रतापराव)
  • मॅक्बेथ (मानाजीराव)
  • राणा भीमदेव (राणा भीमदेव)
  • रामदास (रामदास)
  • संत तुकाराम (तुकाराम)
  • हॅम्लेट (हॅम्लेट)