"सुनील कुलकर्णी (नाट्यगुरू)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कै. सुनील कुलकर्णी ऊर्फ काका कुलकर्णी हे मराठीतील एक प्रसिद्ध ना...
(काही फरक नाही)

१५:१४, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

कै. सुनील कुलकर्णी ऊर्फ काका कुलकर्णी हे मराठीतील एक प्रसिद्ध नाट्यशिक्षक होते. पुण्यात असताना ते पुणे महापालिकेच्या नगररचना विभागात काम करत. तेथे त्यांनी कामगारांची चळवळ सुरू केली होती.

मूळ सातार्‍याच्या असलेल्या कुलकर्णी यांना नाटकाची खूप आवड होती. पुण्यात ते पीडीए नाट्यसंस्थेशी (Progressive Dramatic Assosiationशी) जोडले गेले. त्यानंतर डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर यांच्यासह थिएटर अॅकॅडमीच्या स्थापनेतही ते सहभागी होते. थिएटर अॅकॅडमीच्या 'घाशीराम कोतवाल', 'तीन पैशांचा तमाशा' या नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. थिएटर अॅकॅडमीच्या सचिवपदाचीही जबाबदारी त्यांनी निभावली होती.

नाट्यशिक्षक म्हणून कारकीर्द

नाटकाने झपाटलेल्या सुनील कुलकर्णी यांनी कायमच रंगभूमीशी इमान राखले. आपल्याकडे असलेले रंगभूमीचे ज्ञान नव्या दमाच्या मुलांना द्यावे, ही त्यांची मनोधारणा होती. त्या दृष्टीने कुलकर्णींनी सातार्‍यात 'लोकरंगमंच' ही संस्था स्थापन केली. त्यांनी राज्यभरात तरुण रंगकर्मींसाठी कार्यशाळा घेतल्या. आपल्या आदर्शांसाठी टोकाला जाऊन काम करण्याची तयारी हवी असा विचार त्यांनी रंगकर्मींच्या मनावर बिंबवला.

सुनील कुलकर्णी यांनी विविध देशांत जाऊन वैविध्यपूर्ण नाट्यसंस्कृती आणि रंगभूमीच्या शक्यता आजमावल्या. पुण्या-मुंबईत राहून आरामात नाट्यकार्यशाळा घेऊन पैसा कमावणे त्यांना शक्य होते. मात्र, त्यांनी नेमके तेच टाळले. रंगभूमीला तळागाळापर्यंत नेण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन त्यांनी निःशुल्क कार्यशाळा घेतल्या. तरुण कलावंत हेरून त्यांच्यात रंगभूमीविषयक जाणीव निर्माण केली.

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत नावाजलेले अनेक कलाकार कुलकर्णी यांनी घडविलेले आहेत.

सुनील कुलकर्णी यांचे शिष्य

चित्रपट, नाटक, मालिका यांमध्ये आघाडीवर असलेले सयाजी शिंदे, तुषार भद्रे, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, किरण यज्ञोपवीत, शशांक शेंडे, प्रवीण तरडे, अनिरुद्ध दिंडोरकर, शिल्पकार प्रमोद कांबळे ही सर्व मंडळी कुलकर्णींच्याच तालमीत घडली. कुलकर्णी यांनी या सर्वांना दिलेले रंगभूमीचे धडे ते कसोशीने आचरणात आणतात.