रेल्वे इंजिन हे रेल्वे वाहतूकीसाठी वापरले जाणारे वाहन आहे. एक रेल्वेगाडी वाहून नेण्यासाठी किमान एका इंजिनाची आवश्यकता असते. बरेचदा इंजिन रेल्वेच्या पुढे असते व गाडी ओढण्याची क्रिया करते तर काही वेळा रेल्वेच्या मागे जोडलेले इंजिन गाडी ढकलते. ओढायला एक व ढकलायला एक अशी एका रेल्वेला दुहेरी इंजिनेदेखील आढळतात (उदा. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान कर्जतहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या).

भारतीय रेल्वेचे एक विद्युत इंजिन
१८३० साली वाफेच्या इंजिनावर धावलेली जगातील पहिली प्रवासी रेल्वे

इंजिने विविध प्रकारची उर्जा वापरून चालवली जाउ शकतात. उर्जेवर चालणाऱ्या इंजिनांचा शोध लागण्यापूर्वी रेल्वे वाहतूकीसाठी मनुष्य किंवा घोडे वापरले जत असत. जगातील सर्वात पहिले कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन रिचर्ड ट्रेव्हिथिक ह्या कॉर्निश संशोधकाने बनवले. त्यानंतर नजीकच्या काळात इंग्लंडमधे सालामान्का, पफिंग बिली, द रॉकेट ह्यांसारखी अनेक इंजिने बनवण्यात आली. १८३० साली वाफेच्या इंजिनावर जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मॅंचेस्टरलिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली.

इंजिनांचे प्रकार संपादन

  • वाफेचे इंजिन: कोळसा जाळून एका मोठ्या बंबात पाण्याची वाफ निर्माण केली जाते व ह्या वाफेच्या उर्जेवर इंजिन चालते. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळजवळ सर्व रेल्वेगाड्या वाफेच्या इंजिनांवर चालत असत. वाफेची इंजिने तांत्रिक दृष्ट्या अक्षम असतात व ती चालवायला व कार्यरत ठेवायला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. ह्या कारणांस्तव आधुनिक डिझेल व विद्युत इंजिनांच्या आगमनानंतर वाफेची इंजिने मागे पडली व हळूहळू सेवेतून काढली गेली. भारतीय रेल्वेने १९९७ साली वाफेच्या इंजिनांचा वापर पूर्णपणे बंद केला. सध्या वापरात असणारे सर्वात जुने वाफेचे इंजिन हे १८५५ साली तयार केले गेलेले फेरी क्वीन हे असून ते आजही भारतातील दिल्ली ते अलवर ह्या स्थानकांदरम्यान धावते.
  • विद्युत इंजिन: ह्या प्रकारचे इंजिन विद्युतशक्तीवर चालते. लोहमार्गांच्या वर विद्युतभाराचा पुरवठा करणाऱ्या तारा उभारल्या जातात व ह्या तारांद्वारे इंजिनाला विद्युतपुरवठा होतो. लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्यासाठी बराच खर्च येतो परंतु विद्युत इंजिने चालवण्यासाठी कमी खर्च येतो व विद्युत इंजिनांचे आयुर्मान बरेच जास्त असते. जगातील बहुसंख्य देशांमधील रेल्वेगाड्या सध्या विद्युत इंजिनांवर चालतात. भारतातील ८५ टक्के प्रवासी रेल्वे वाहतूकीसाठी विद्युत इंजिने वापरली जात आहेत.

गॅलरी संपादन

हे सुद्धा पहा संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: