रविवार हा आठवड्यातील एक वार आहे. सोमवारपासून मोजला तर हा आठवड्यातील शेवटचा, म्हणजे सातवा दिवस येतो. भारतामध्ये हा ’रवि’चा म्हणजे सूर्याचा दिवस समजला जातो. त्यामुळे याला आदित्यवार (आदित्य==सूर्य) किंवा बोली भाषेत आइतवार म्हटले जाते; आणि इंग्रजीत सन्‌डे.

ज्या ज्या देशावर कधी काळी ब्रिटिश सत्ता होती त्या त्या देशात रविवार हा सुटीचा दिवस असतो. शिक्षणसंस्था, कार्यालये आणि बँका या दिवशी बंद असतात.

एके काळी भारतात कामगारांना रविवारची सुटी नसे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत इ.स. १८८४मध्ये ’बॉंबे मिल हॅंड्स’ ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यांनी त्या काळच्या फॅक्टरी कमिशनकडे अनेक मागण्या केल्या. त्यातली रोजच्या कामातली अर्ध्या तासाची जेवणाची सुटी आणि रविवारची साप्ताहिक सुटी या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या. त्यासाठी २४ एप्रिल १८९० रोजी हजारो कामगारांचा मोर्चा निघाला होता. अखेर १० जून १८९० पासून दर रविवारची सुटी देण्याचे गिरणी मालकांनी मान्य केले. २०१५ साली १० जूनला या रविवारच्या सुटीचा १२५वा वर्धापन दिन साजरा झाला. पुण्यात रविवार हा मिसळवार म्हणून ओळखला जातो.