मखराम पवार हे महाराष्ट्राचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील लोहगड येथे झाला. त्यांनाबहुजन केसरी म्हणून ओळखतात.[ संदर्भ हवा ] त्यांनी बहुजन महासंघाची स्थापना करून बहुजनांचा सत्ता सहभागाचा प्रयोग केला. सारे बहुजन एक होऊ सत्तेची चाबी हाती होऊ हा त्यांचा संदेश होता. पवार १९९० मध्ये मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते १९९८ मध्ये विधान परिषदेवरही निवडून गेले होते. १९९८ ते २००१ या कालावधीत ते राज्याचे व्यापार आणि वाणिज्य, दारुबंदी प्रचार कार्य आणि खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रीही होते.

महाराष्ट्र राज्य सेवेमध्ये ते विक्रीकर उपायुक्त या उच्चस्तरीय पदावर कार्यरत होते. परंतु समाजसेवा करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला व राजकारणात भाग घेतला. बहुजनातील सर्व घटकांना सोबत घेऊन बहुजन महासंघ या राजकीय संघटनेची स्थापना केली. पुढे प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षासोबत विलीनीकरण केले.

शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे अधिवेशन दरम्यान गोवारी समाजातील ११४ लोक आंदोलन करतांना शहीद झाले, या घटनेचा निषेध म्हणून मखराम पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी अनेक आंदोलने केली. मंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूर येथे त्यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापना केली.

पवार समाजकारणात देखील अतिशय सक्रिय होते. सन २०२१ मध्ये ८ ऑगस्ट रोजी मुंबई येथील लीलावती हाॅस्पीटलमध्ये वयाच्या ८२ वर्षी त्यांचा मृत्यू झाला.