पिसूरी हरीण

(पिसोरी या पानावरून पुनर्निर्देशित)


पिसूरी हरीण तथा पिसोरी (इंग्लिश: Chevrotain, शेव्रोटेन/Mouse deer, माउस डियर) हे सर्व हरीणांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. पिसूरीचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला माउस डियर असेही म्हणतात. कस्तुरीमृगाप्रमाणेच त्यांना सुळे असतात.

पिसूरी हरीण

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
(Artiodactyla)

कुळ: त्रागुलिडी
(Tragulidae)

हेन्री मिल्ने-एडवर्ड्स, इ.स. १८६४
जातकुळी

पिसूरी हरीण हे युग्मखुरी वर्गात गणल्या जाणाऱ्या त्रागुलिडी कुळातील प्राणी असून आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत आढळतात. यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० सेमी असते.

जाती संपादन

 
पिसूरी हरीण

पिसूरी हरणाच्या दोन विशिष्ट जाती आढळताता. एक आशियायी पिसूरी हरीण व दुसरी आफ्रिकी पिसूरी हरीण, पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या घनदाट जंगलात आढळते. आशियायी पिसूरी हरणाच्या पाच उपजाती आढळतात. यांपैकी एक उपजात भारतात आढळते.

भारतात पिसूरी हरीण दक्षिण भारताच्या जंगलात, पश्चिम भागातील जंगलात आणि ओरिसाच्या पूर्व किनाऱ्यावर आढळते. याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेशात १८०० मीटर उंचीवर ते राहतात.

शरीररचना संपादन

पिसूरी हरीण शरीराने दुबळे, बारीक आणि फार लहान असते. त्याची उंची २५ ते ३० सें.मी. पर्यंत असते. शरीराची बनावट अशी आहे की, शरीराचा पुढचा भाग उंच आहे असे वाटते. यांच्या शरीराचा रंग फिकट भुरकट असतो. त्यावर फिकट पिवळे पट्टे संपूर्ण शरीरावर असतात. दुरून पाहिल्यावर त्या लांबट रेघा आहेत असे वाटते. पिसूरींच्या शरीराचा खालचा भाग, पोट इतर हरिणांप्रमाणे पांढरे व पिवळे असते. त्यांच्या शरीरावर लहान, मुलायम बारीक केस असतात. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. या हरणांचे डोळे गर्द भुरकट आणि कान सामान्य आकाराचे असतात.

पिसूरी हरणांची शेपूट फार लहान असते आणि ती नेहमीच शरिराला चिकटलेली असते. त्यांच्या मानेवर पांढऱ्या रंगाच्या तीन धारा असतात. डोके इतर हरिणांपेक्षा लहान असते. नाकपुड्या टोकदार आणि थोड्या पुढे आलेल्या दिसतात. खूर विभागलेले असते. चालताना त्यांच्या शरीराचा भुरकट भाग यावरच असतो. ते खुराच्या टोकावर जोर देऊन चालतात त्यामुळे त्यांच्या चालण्याचा कोणताही आवाज होत नाही.

राहण्याचे ठिकाण संपादन

 
सिंगापूर येथे आढळलेले पिसूरी हरीण

या हरीणांना लहान लहान सावली देणारे वृक्ष असलेल्या घनदाट जंगलात आणि कोरड्या मैदानात राहणे आवडते. तेथे ते नदीजवळ किंवा तलाव किंवा झाडी असलेल्या खडकाळ भागात आपले घर बनवितात. त्यामुळेच ते जंगलात मुक्तपणे वावर करताना फारसे दिसत नाही. ते बहुतेक खडकाच्या कपारीत किंवा दगडाखाली लपून बसणे पसंत करतात.

पिसूरी हरीण फार भित्रे असतात. ते बहुतेक रात्रीच बाहेत पडतात. थोडासा जरी आवाज आला तर ते एखाद्या कोपऱ्यात दडून बसतात, परंतु कधी कधी ते कळपाबरोबर सकाळीही दिसतात आणि लवकरच दिसेनासे होतात.

अन्न संपादन

पिसूरी हरीण हे चरणारे प्राणी आहेत त्यामुळे यांचे मुख्य अन्न जंगली वनस्पती, गवत, पाने इत्यादी आहे. ते खाली पडलेले फळेही खातात.

या हरीणांना पाणी फार आवडते. त्यामुळे हे प्राणी नदी किंवा जलस्त्रोताजवळ आपले घर करतात. ते थंडीतही वारंवार पाणी पितात; परंतु पाण्याच्या शोधार्थ जास्त दूर अंतरावर जात नाहीत. सूर्य उगवताच ते चरायला बाहेर पडतात. सुमारे ३ ते ४ तास मोकळ्या मैदानात ते चरत राहतात. संध्याकाळी ते पुन्हा चरतात, परंतु आपल्या निवासस्थानापासून दूर जात नाहीत. वस्तीच्या जवळच्या जंगलात दिवसा न जाता रात्री छोट्या छोट्या कळपांनी चरायला जातात.

प्रजनन संपादन

मादी पिसूरी पावसाळ्यानतर किंवा ऑक्टोबर महिन्यात खडकाच्या कपारीमध्ये किंवा गुहेत सामान्यपणे एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते. त्यासाठी मादी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेते. कारण त्यांची पिल्ले जंगली कुत्रे, लांडगे, घारी, साप इत्यादींची शिकार होतात.

संरक्षण संपादन

वास्तविक पिसूरी हरीण हा साधा, सरळ आणि भित्रा प्राणी असतो. जंगलातील लहानात लहान हिंस्त्र प्राणी याला मारून खाऊ शकतो. परंतु पिसूरी तसा सावध असतो. धोका दिसताच धूम ठोकतो आणि लवकरच सुरक्षित ठिकाणी जाऊन लपतो. याचे शत्रू कुत्रे, लांडगे जेव्हा याचा पाठलाग करतात तेव्हा तो लगेच झाडावर चढतो. अशारीतीने तो स्वतःचे संरक्षण करतो. झाडावर चढण्याचे वैशिष्ट्य याच्याशिवाय कोणत्याही हरीणामध्ये दिसत नाही. स्वभावाने लाजाळू असलेल्या हा प्राणी एकटेच राहणे पसंच करतो.

हे सुद्धा पहा संपादन

प्रेटर, एस. एच. द बुक ऑफ इंडिअन अनिमल्स (इंग्रजी भाषेत).