महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडीतुमसर तालुक्‍याच्या सीमेवर रामटेक- तिरोडा -गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (NH-753) पासून १ किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या अथांग पात्रात वसलेले माडगी येथील प्रसिद्ध नृसिंह (नरसिंह टेकडी)[१] मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु व तुमसर तालुक्यातील माडगी येथील हे नृसिंह मंदिर बहुधा विदर्भातील एकमेव असावे. भंडारा जिल्ह्यात हे तीर्थक्षेत्र मिनी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. नृसिंह टेकडीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 'क श्रेणी'चा दर्जा[२] प्राप्त आहे. वैनगंगेच्या पात्रात कुशीत मोठ्या दगडांच्या टेकडीवर हे मंदिर आहे. येथील सिंदुरचर्चीत भव्य व तेजस्वी अशी भगवान नृसिंहाची व लक्ष्मीची स्वयंभू तेजस्वी मूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मुख्य दरवाजातून सरळ आत गेल्यास एक हवनकुंड आहे. हवनकुंडाच्या बाजूने काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर मंदिर आहे. हे मंदिर तळघरासारखे भासते. तेथे दाराजवळ उजवीकडे हनुमंताची मूर्ती आहे. समोर नृसिंह भगवानाची पाच फूट उंच विशाल मूर्ती दिसते. जवळ खिडकीतून भगवंताच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडून ती अधिक विलोभनीय दिसते. याच मंदिरात गणपती, आदिशक्ती दुर्गा देवी, अन्नपूर्णा देवी यांच्या पुरातन मूर्ती आहेत.[३]

संतांचे वास्तव्य संपादन

 
नृसिंह व लक्ष्मीची स्वयंभू तेजस्वी मूर्ती

योगीराज स्वामी सितारामदास महाराजाच्या[४] आदेशावरून संत हनुमानदास अण्णाजी महाराज हे नरसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले होत. त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळीक होती. राष्ट्रसंतांनी नृसिंह टेकडीवर भेट दिली होती. अण्णाजी महाराजांनी नृसिंह टेकडी येथे तपश्चर्या,उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला व परिसरातील स्थनिकांच्या अडचणी सोडवून जनसेवेत आपले आयुष्य समर्पित केले.[५] अण्णाजी महाराजांचे येथे सुमारे ४० ते ४५ वर्षे वास्तव्य होते. येथे त्यांची समाधी आहे.

दर्शन मंडप संपादन

संपूर्ण भारतात नदीच्या मध्यभागी असलेले मंदिर सापडणे दुर्लभ आहे. वैनगंगेच्या कुशीत मोठ्या पांढरेशुभ्र दगडाच्या टेकडीवर निसर्ग निर्मित खडकाळ भागात नदीच्या मध्यपात्रात वसलेले हे आगळेवगळे ऐतिहासिक नृसिंह मंदिर आहे. येथे नृसिंह-लक्ष्मी यांच्या स्वयंभू मूर्ति आहेत. मंदिरात हनुमानाचे मंदिर आहे.मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार एकच आहे. पायऱ्यांच्या सहाय्याने उंच असलेल्या सभामंडपावर चढून आसमंतातील दुरवरचा परिसर न्याहाळता येतो. नृसिंह मंदिराच्या गर्भगृहातून व दर्शन मंडपातून माडगी पूल नजरेस पडते. मंदिराचे गर्भगृह उंच भागावर असल्याने नदीच्या महापुराचे पाणी गर्भगृहात पोहचत नाही. मंदिरातील पुजेची जबाबदारी गोसावी जमातीतील लोकाकडे पूर्वापार रिवाजानुसार चालत आलेली आहे.

टेकडीचे वैशिष्ट्य संपादन

पूर्वीच्या काळी दंडकारण्य या नावाने संबोधण्यात येणाऱ्या या प्रेदेशातील नृसिंह टेकडी प्राचीन काळी संन्यासी व ऋषी-मुनींच्या साधनेचे स्थान होते. पुर्वी टेकडीच्या अवतीभोवती नदी व नदीकाठावर घनदाटजंगल असल्याचे जाणकार सांगतात. या वनात हिंस्त्र पशुंचाही संचार असायचा. भर दिवसा भगववंताच्या दर्शनासाठी एकटे जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती. दर्शनासाठी जायचेच झाले तर दर्शनार्थी समुहाने मंदिरात जायचे. रात्रीचे वेळी कोणीही तिथे मुक्कामास राहत नव्हता. या स्थानावर अण्णाजी महाराजांनी वास्तव्य केले. हे स्थान भाविकांना व निसर्गप्रेमी पर्यटकांना वेड लावणारे आहे. या ठिकाणी वैनगंगा आपल्या उपनद्यांना सोबत घेऊन मंदिराला पिंगा घालत असल्याचा भास होतो. नदिचे दोन भाग होवून आजुबाजुला उंच वृक्ष आहेत. टेकडी समोरील भागात प्रवाह शिघ्र असतो, तर टेकडीच्या दक्षिणेला नदीचा प्रवाह मंदावतो. नदीपात्वारात पांढरी-शुभ्र वाळू दूरवर पसरलेली आहे. मंदिराच्या परिसरात औदुंबर (उंबर), कळंब, चिंच,कडुलिंब अशा नानाविध प्रजातीच्या वृक्षांनी आच्छादलेली ही टेकडी वनश्रीने सुशोभीत झालेली आहे. दोन दशकांच्या आधी एका भक्ताने मंदिरापर्यंत चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूला असलेले मुंबई नागपूर-हावडा रेल्वे लाइनवरील रेल्वे पूल आहे. या नदीपात्रात मंदिराच्या बाजूला नदीपात्रात पाहिले असता, मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे लाइनवर असलेल्या रेल्वे पुलाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. टेकडी समोरील भागाला पाण्याचा प्रवाह शिघ्र असतो. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एक रूंद चबुतऱ्यांच्या दोन्ही बाजूला एक मजबूत सिमेंटचे परकोट बांधलेली असून दर्शनास येणाऱ्या आबाल वृद्धांना कसलीही पडण्याची भिती नसते.[६]

यात्रा संपादन

 
नृसिंह यात्रा

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसाची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत्ये. यात्रेच्या निमित्ताने भक्तांचा लोंढा नृसिंह टेकडीच्या दिशेने वळत असतो. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक नदीपात्रात गर्दी करतात व वैनगंगेच्या निर्मळ पाण्याने पवित्र स्नान करून पूजन अर्चना करतात. या यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीगढ राज्यातील हजारो भाविक हजेरी लावतात.[५] यात्रेत अनेक जीवन आवश्यक वस्तूंची दुकाने, आकाश झुले लागतात. बच्चे कंपनी उत्साहाने यात्रेत आले येतात.

 
अण्णाजी महाराज पुण्यतिथी सोहळा २०२२

या यात्रेची सांगता संत श्री हनुमानदास (अण्णाजी) महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी करण्यात येते. या निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अभिषेक, पुजा, श्रीरामचरीत मानस अखंड पारायण, यज्ञ पुर्णाहुती, श्रद्धांजली, सामूहिक प्रार्थना, कीर्तन, गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या संपूर्ण कार्यक्रमात हजारो भाविक उपस्थित राहतात.[७]

खोल डोह संपादन

मंदिरामागे वैनगंगा नदीच्या पात्रात खोल डोह आहे. ४५ वर्षापुर्वी केवटांनी डोहाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खाटेला पुरेल ऐवढी नारळाची दोरी घेऊन एका टोकाला वजनदार दगड बांधला व नाव डोहाच्या मघात आणून स्थिर केली. दोरास बांधलेला दगड पाण्यात सोडला, पण आश्चर्य दगड तळापर्यंत पोहचलाच नाही, अशी दंतकथा परिसरात प्रसिद्ध आहे. असा हा अथांग खोल डोह मंदिरामागे दक्षिणेला आहे.

छायाचित्र दालन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भंडारा जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन २००९" (PDF). महाराष्ट्र शासन.
  2. ^ "Narsingh Tekdi News in Hindi, Latest Narsingh Tekdi News Headlines, Breaking Narsingh Tekdi News in hindi, Narsingh Tekdi Live Updates, Photos, Videos & Audio - Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2023-01-05 रोजी पाहिले.
  3. ^ "माडगीच्या नृसिंह मंदिराची पर्यटक, भाविकांना ओढ, निसर्गरम्य परिसराला पर्यटन विकासाची गरज". eSakal - Marathi Newspaper. 2023-01-04 रोजी पाहिले.
  4. ^ Says, गुरूपूर्णिमा महोत्सव-वरदान आश्रम में धूमधाम से मनाया|mekalwani- Mekalwani (2021-07-23). "किनके पास हैं स्वामी सीताराम जी की खड़ाऊ?महाराष्ट्र में कई स्थानों पर हैं इनके आश्रम|mekalwani - mekalwani" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-01-05. 2023-01-05 रोजी पाहिले.
  5. ^ a b author/lokmat-news-network (2018-12-04). "माडगी भगवान नृसिंह पावनधामवर यात्रेचा शुभारंभ". Lokmat. 2023-01-05 रोजी पाहिले.
  6. ^ author/admin (2016-01-07). "भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नृसिंह टेकडी". Lokmat. 2023-01-05 रोजी पाहिले.
  7. ^ "नृसिंह महोत्सव व श्री संत हनुमानदासजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित". Crime India News (इंग्रजी भाषेत). 2023-01-05 रोजी पाहिले.