हे उपनिषद् ऋग्वेदाशी संबंधित आहे. याच्यात जीवनाच्या परमध्येयाचे तसेच आवागमनापासून मुक्त होण्यासाठी साधनभूत ‘निर्वाण’ विषयाचे विवेचन केलेले आहे. या उपनिषदात सूत्रात्मक पद्धतीने परमहंस संन्यासाच्या गूढ सिद्धांतांचे रहस्यात्मक शैलीने विवेचन केलेले आहे. सर्वप्रथम परमहंस संन्यासाचा परिचय दिलेला आहे. त्यानंतर दीक्षा, देवदर्शन, क्रीडा, गोष्टी, भिक्षा, आचरण यांचे परमहंस संन्यासासाठी कोणते स्वरूप आहे याचे विवेचन केलेले आहे. पुढे जाऊन पुन्हा मठ, ज्ञान, ध्येय, कंथा (गोधडी), आसान, पटुता, तारक उपदेश, नियम अनियामकत्व, यज्ञोपवीत, शिखा आणि मोक्ष इत्यादींची संन्यासासाठी वास्तविक कोणती स्थिती आहे याचे निरूपण केलेले आहे आणि हे सांगितलेले आहे हेच निर्वाणाचे तत्त्वदर्शन आहे. हे तत्त्वदर्शन श्रद्धा-समर्पणयुक्त शिष्य व पुत्रासच प्रदान केले पाहिजे. सामान्य व्यक्तीस या तत्त्वदर्शनाचा कोणताही लाभ प्राप्त होऊ शकत नाही.