तदानुभूती म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून त्याच्या भावना, विचार, व वागण्याची पद्धत समजून घेऊन त्यानुसार केलेले वर्तन होय. समोरील व्यक्तीला काय वाटत असेल, तो व्यक्ती असे का वागत असेल, तसेच परिस्थितीमुळे त्याने केलेले वर्तन आणि निर्माण झालेल्या भावना समजून घेऊन तसेच त्यानुसार प्रतिक्रिया देऊन एखादा व्यक्ती वागते तेव्हा ती तादानुभूतीपूर्वक वागते असे म्हणण्यास हरकत नाही.

बराच वेळा आपण फक्त सहानुभूतीपूर्वक वागतो. म्हणजेच आपल्याला फक्त त्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीच वाटते. त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे आपल्याला त्याची कीव येते. आपण फक्त अरेरे असे म्हणून सोडून देतो. परंतु जेव्हा आपण तदानुभूतीचा वापर करतो तेव्हा त्या व्यक्तीची कीव न करता पूर्णपणे त्याच्या जागी जाऊन विचार करू लागतो. असा विचार करून त्याच्या भावना समजून घेणे खरतर सोप्पे नसते . त्यासाठी स्वतः मानसिक दृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे असते.