जर्मनीचे पुन:एकत्रीकरण

जर्मनीचे पुनःएकत्रीकरण (जर्मन: Deutsche Wiedervereinigung) ही इ.स. १९९० सालामधील एक घटना होती ज्यामध्ये पश्चिम जर्मनीपूर्व जर्मनी ह्या युरोपामधील दोन राष्ट्रांचे एकत्रीकरण होऊन जर्मनी हा देश पुन्हा एकदा एकसंध बनला. तसेच पूर्वपश्चिम बर्लिन एकत्र करून बर्लिन शहर देखील एकसंध बनले. ३ ऑक्टोबर हा जर्मन एकता दिवस मानला जातो.

जर्मनीच्या फाळणीनंतरच्या नकाशावर पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी व पिवळ्या रंगाने दाखवलेले पश्चिम बर्लिन

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मन राष्ट्राची फाळणी करून पूर्वपश्चिम जर्मनी हे दोन स्वतंत्र देश निर्माण केले. तसेच बर्लिनचे दोन तुकडे करण्यात आले. पूर्व जर्मनीने सोव्हिएत संघाच्या छत्रछायेखाली कम्युनिस्ट पद्धतीचा स्वीकार केला तर पश्चिम जर्मनी इतर पश्चिमात्य देशांप्रमाणे लोकशाही देश बनला. पूर्व जर्मनीने पश्चिमेकडे सतत होणारे नागरिकांचे पलायन थांबवण्यासाठी भिंत बांधली. ही भिंत शीत युद्धाची एक मोठी खूण समजली जात असे.

१९८० च्या उत्तरार्धात सोव्हिएत संघात आर्थिक मंदी आल्यानंतर पूर्व युरोपामधील अनेक कम्युनिस्ट राजवटी पडल्या. १९८९ साली पूर्व जर्मनीमध्ये कम्युनिस्ट-विरोधी शांततापूर्वक चळवळी केल्या गेल्या ज्यांची परिणती म्हणून ९ नोव्हेंबर १९८९ रोजी बर्लिनची भिंत पाडून टाकली गेली. १९९० सालच्या अनेक वाटाघाटींनंतर पूर्व व पश्चिम जर्मन नेत्यांनी एकत्र व्हायचे ठरवले. हेल्मुट कोल हा एकत्रित जर्मनीचा पहिला चान्सेलर बनला.