कागदावर शाईने यांत्रिक पद्धतीने छपाई करण्याच्या ठिकाणाला छापखाना म्हणतात. चाकाच्या शोधाने मानवी आयुष्याला गती दिली ; तर ' प्रिंटिंग प्रेस 'च्या शोधाने मानवी व्यवहाराला. व्यवसायाने सुवर्णकार असलेल्या आणि जर्मन देशामध्ये राहणाऱ्या जोहान्स गटेनबर्गच्या या शोधामुळे ' वाङ्मया 'ला एकदम ' साहित्या 'चा दर्जा प्राप्त करून दिला. अर्थात कागदाचा शोध अगोदरच लागल्याने ' प्रेस 'च्या कामाला अधिक ' अर्थ ' आला. पण हे फार पूर्वीचे... दरम्यान ' दिसामाजी काहीतरी लिहावे ' वाले लिहीतच होते ; पण ते सर्वदूर पोचत नव्हते. ते पोचले ' प्रिंटिंग प्रेस 'च्या उदयानंतर. या विषयासंबंधात फार मागे जायचे नाही , असे ठरवले आणि गेल्या २५ ते ३० वर्षांचा आढावा घेतला तरी ' प्रिंटिंग प्रेस 'च्या तंत्रात झालेला बदल हा इतर कोणत्याही व्यवसायातील बदलांच्या तुलनेत अधिक आणि जलद आहेत. ' ट्रेडर ' या वरकरणी स्वयंपाकघरातील ' पोळपाट-लाटणे ' सारख्या दिसणाऱ्या प्रिंटरपासून ते ब्लॉक मेकिंग करावे लागणाऱ्या ' लेटरप्रेस ' आणि त्यानंतर ' प्लेटस ' पासून ते ' सीटीपी ' असा झालेला ' ऑफसेट ' प्रवास अगदी काही वर्षांतील आहे , हे सांगून खरे वाटणार नाही. पूर्वी हाताने खिळे जुळवून ' फॉर्म ' बनविण्यात येत असे. हा फॉर्म पाट्यावर बसवून मग तीवर शाईकाम करून छपाई करण्यात येई. त्या शाईचा एक विशिष्ट वास असे. आणि तो वास ज्याच्या नाकामध्ये बसला आहे , त्याला त्या जागेपासून दूर जाणे सहजपणे जमत नाही , असे गमतीने म्हटले जाई. आणि त्यामध्ये काहीसे तथ्यही होते. छापखान्यात काम करणारा माणूस तिथल्या वातावरणात इतका आणि असा काही रुळायचा की त्याला अन्य ठिकाणच्या नोकरीचे किंवा व्यवसायाचे आकर्षण वाटेनासे व्हायचे. त्यावेळचे छापखानेही वेगळे होते आणि त्यातील वातावरणही जरा हटकेच असायचे. विशेषतः लहान छापखान्यांबाबत तर हे फारच खरे होते. त्यामध्ये एक कौटुंबिक वातावरण असे आणि छपाईचे वेळापत्रक पाळावयाची सततची घाईगर्दीही असे. अर्थात त्याही काळात टंगळमंगळ करणारे आणि आपल्या दिरंगाईला किंवा चुकांना नामी सबब सांगणारेसुद्धा होते. त्यामुळेच ते काहीवेळा विनोदी लेखनाचे विषयही बनले. हे चित्र हळूहळु पालटत गेले. मात्र १९८० च्या दशकात या ' लेटरप्रेस ' वरील शाई उडू लागली आणि ' ऑफसेट ' तंत्रज्ञान ' सेट ' होऊ लागले. एक-एक अक्षर जुळवण्याचा आणि त्यामुळे अपरिहार्यपणे पुढे होणाऱ्या ' प्रिंटिंग ' साठी लागणाऱ्या वेळात कमालीची बचत झाली. पुस्तकासाठी टाइप केलेला ' ब्लॉक ' ( फॉर्म) लेटरप्रेसच्या जमान्यात फारकाळ जपून ठेवता येत नव्हता. त्याचा परिणाम पुस्तकाच्या पुनर्मुद्रणावर होत असे. कारण प्रत्येक वेळी तो फॉर्म सोडवून टेवावा लागत असे. पर्यायाने पुस्तकाच्या प्रत्येक नवीन आवृत्ती वा पुनर्मुद्रणाच्या वेळी तो पुन्हा पहिल्यापासून नव्याने जोडावा लागत असे. हे खूप वेळखाऊ काम होते. मात्र गेल्या २५ वर्षांमध्ये या व्यवसायात कम्प्युटरीकरणामुळे झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे फॉर्म आता जुळवून आणि जपून ठेवावे लागत नाहीत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसुद्धा आता इतिहासजमा झाल्या आहेत. आणि आतातर डिजिटल प्रिंटिंगमुळे प्लेटसचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले आहे. मधल्या काळात स्क्रिन प्रिंटिंगवर मोठ्या प्रमाणात काम होत होते. स्क्रिन केलेले आर्टवर्क दिसायचेसुद्धा छान. मात्र तेसुद्धा सबुरीचे काम असल्याने आता सगळ्यांचा कल डिजिटल प्रिंटिंगकडे दिसतो. लेटरप्रेस आणि त्यासाठी होणारे ब्लॉक मेकिंग हे आज अगदी अभावानेच पाहायला मिळतात. प्रामुख्याने बँकांचे चलन , पीएच.डी.चे प्रबंध आणि नंबरिंग यासाठी ते वापरले जातात. बाकी सर्वत्र ऑफसेटचेच राज्य आहे. ऑफसेटमुळे छपाई जलद , सुबक आणि सुलभ झाली आहे. याचा सर्वाधिक फायदा झाला , तो रंगीत छपाईला. प्रिंटिंग आणि डिझाईन क्षेत्रात कार्यरत असणारे काही मुद्रणकार याबद्दल सांगतात , ' दगडावरील छपाई , ग्रॅव्ह्यूअर , लिथो ते आजच्या डिजिटल छपाईपर्यंत झालेले बदल या व्यवसायाने तत्परतेने स्वीकारले. त्यामुळेच व्यवसायाची भरभराट झाली. पूर्वी एखादा रंगीत फोटो छापायचा म्हणजे अगदी जिकिरीचे काम असे. विविध पातळ्यांवर आठ ते १० लोक त्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असत. आज अवघ्या काही मिनिटांत रंगीत फोटोची छपाई होते. या व्यवसायात आज दिसणारे प्रिंटर हे प्रामुख्याने दुसऱ्या वा तिसऱ्या पिढीतील आहेत. नवीन पिढी या व्यवसायाकडे वळताना फारशी दिसत नाही. याचे कारण क्षेत्रामध्ये दर काही वर्षांनी होणारे तांत्रिक बदल आणि त्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी फार मोठा खर्च येतो. तो सगळ्यांनाच झेपतो असे नाही. यावर उपाय म्हणून अनेकदा विदेशात वापरलेली मशीन्स ४० ते ५० टक्के किमतीत विकत घेतली जातात. अर्थात , याचा ' उत्पादना 'च्या दर्जावर परिणाम होतोच. मात्र काही निवडक अपवाद वगळता बहुतांशी प्रिंटरकडे वापरलेली मशीन्स आहेत , हे सत्य आहे. कम्प्युटरीकरणाचा सर्वात जास्त फटका या व्यवसायाला बसला. ' पेपरलेस वर्ल्ड ' या संकल्पनेमुळे शक्य तेवढी कमी छपाई करण्याकडे कल वाढतो आहे. त्यामुळे नवीन मशीन विकत घेणे परवडत नाही. छपाईच्या कागदावरील इंचनइंच लीलया रंगवून देणाऱ्या या व्यावसायिकांच्या चेहऱ्यांवरील रंग मात्र उडाले आहेत. मुंबई-पुण्यातील वडिलोपार्जित प्रेसधारकांनीही मुख्य शहरातील जागा विकून अथवा भाड्याने देऊन शहराबाहेर स्थलांतर केले आहे. काहींनी डीटीपी युनिट , तर काहींनी कमी जागेत जास्त व्यवसाय देणारी डिजिटल प्रिंटिंग यंत्रणा बसवून व्यवसायासोबतची नाळ कायम राखण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर काहींनी या व्यवसायाला रामराम केला आहे.