पु. ल. देशपांडे 'बंगाली' शिकण्‍यासाठी शांतिनिकेतनामध्‍ये आपल्‍या पत्‍नीसह काही दिवस जाऊन राहिले होते. तेथे त्‍यांनी बंगाली भाषा शिकण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रयत्‍नांतील आनंद, तसेच बंगालमधील तत्‍कालीन सामाजिक परिस्थिती, शांतिनिकेतनचे राष्‍ट्रीयीकरण झाल्‍यानंतरची सदर संस्‍थेची परिस्थिती व तेथील लोकांची मनस्थिती, या बंगालच्‍या यात्रेत भेटलेली लक्षात राहण्‍यासारखी माणसे यांचे वर्णन पु. लं. नी 'वंगचित्रे' या पुस्‍तकात केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे सदर पुस्‍तकाच्‍या विक्रीतून आलेले उत्‍पन्न काही सामाजिक कार्यासाठी (दान करण्‍यासाठी) वापरले जाते. मी वाचलेल्‍या पु. लं. च्‍या पुस्‍तकांमधील मला सर्वात जास्‍त आवडलेले हे पुस्‍तक आहे. छोट्या छोट्या वाटणा-या मात्र मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणा-या गोष्‍टींवर या पुस्‍तकामध्‍ये सुंदर मार्गदर्शन मिळते. उदाहरणार्थ मुलांना त्‍यांच्‍या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे हा विषय किंवा मुलांचा मोठे होतांना विकास कसा होतो. या सर्वांचा आनंद घेण्‍यासाठी हे पुस्‍तक वाचणे गरजेचे आहे. हे पुस्‍तक बुक गंगा डॉट कॉम या मराठी पुस्‍तकांची विक्री करणा-या वेबसाईटवर उपलब्‍ध असावे.

"वंगचित्रे" पानाकडे परत चला.