एक प्राचीन राज्य आणि सध्याच्या अफगाणिस्तानातील कंदहार प्रांत. पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी गांधार नावाने ज्ञात होता. तक्षशिला, पेशावर ही ठिकाणे या प्रदेशाच्या राजधान्या राहिलेली ठिकाणे आहेत.

इतिहास संपादन

इ.स. पूर्व सहाव्या शतकात इराणचा सम्राट दरियस याने हा भाग जिंकून आपल्या साम्राज्याला जोडला होता. बऱ्याच वर्षांनी हा प्रदेश अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर हा प्रदेश ग्रीक व इंडो पार्थियन यांच्या सात्तेखाली होता. पुढे जेव्हा तो कुषाण साम्राज्याचा भाग बनला तेव्हा पुरूषपूर (पेशावर) ही त्याची राजधानी बनली. गुप्त काळी या प्रदेशावर यवन, शक इत्यादी परकीयांची सत्ता होती. इ.स.चे सहावे ते दहावे शतक मूळचे तुर्की असणारे साही वंशाच्या राजांचे राज्य होते. त्यानंतर गझनीच्या महंमदाने हा प्रदेश जिंकला. तेव्हापासून इ.स.च्या अठराव्या शतकापर्यंत या भागावर निरनिराळ्या मोगल राजांनी राज्य केले. इ.स.च्या १९ व्या शतकाच्या प्रारंभी रणजितसिंगाने हा प्रदेश आपल्या राज्याला जोडला आणि नंतर इ.स. १८४९ साली तो इंग्रजांच्या ताब्यात गेला.