अबुल फझल

मुघल साम्राज्याचे एक वजीर

शेख अबुल फझल इब्ने मुबारक (१४ जानेवारी, इ.स. १५५१ - १२ ऑगस्ट, इ.स. १६०२) (उर्दू: ابو الفضل) हा मुघल सम्राट अकबराच्या काळातील मुघल साम्राज्याचे वजीर होता. हा अकबराच्या नवरत्नांतील एक मानला जातो. याला अबु'ल फझल, अबु'ल फद्ल आणि अबु'ल फद्ल 'अल्लामि नावानेही ओळखला जातो. याने अकबरनामा नामक मुघल इतिहासातील प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तसेच याने अकबराच्या राज्याचा अधिकृत इतिहासही तीन भागांत लिहिला. हा ग्रंथ आईन ए अकबरी या नावाने ख्यातनाम आहे. याशिवाय याने बायबलाचा फारसी अनुवादही केला.

अकबरनाम्यात चितारलेले अकबराच्या दरबाराचे दृश्य

चरित्र संपादन

सिंध प्रांतात राहणाऱ्या व मूळच्या येमेनी वांशिकतेच्या शेख मुसा याचा अबुल फझल हा पाचवा पुत्र होता. अबुल फझलाचा जन्म आग्र्यात झाला. इ.स. १५७५ साली तो अकबराच्या राजदरबारात दाखल झाला व दख्खनेतील युद्धात त्याने मुघल सैन्याचे नेतृत्व केले. अकबराच्या उदारमतवादी धार्मिक विचारांवर अबुल फझलाचा प्रभाव होता.

मृत्यु संपादन

मुघल राजपुत्र सलीम, ऊर्फ जहांगीर, याच्या यौवराज्याभिषेकास त्याचा विरोध होता. यामुळे राजपुत्र सलीम याने रचलेल्या कटात इ.स. १६०२मध्ये वीरसिंह बुंदेला (उत्तरकाळात ओरछ्याचा राजा बनलेला) यांनी सराय वीरआंत्री (नरवर) यांच्यानजीक त्याची हत्या केली व त्याचे कापलेले शिर राजपुत्र सलीम याच्याकडे पाठवले. पुढे मुघल सिंहासनावर बसलेल्या जहांगीराने अबुल फझलाचा पुत्र शेख अब्दुर रहेमान अफझल खान यास इ.स. १६०८ साली बिहार सुभ्याच्या सुभेदारपदी नेमले.

संदर्भ संपादन