अगस्त्य महर्षी (नामभेद: अगस्त्य, मैत्रावरुणी, अगस्ति;) हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तर्षींपैकी मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य हे वसिष्ठ ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. ‘अगस्त्य’ हे भगवान परमशिवांचेदेखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिळमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. ऋग्वेदामध्ये (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत काशीक्षेत्रातील त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.

अगस्त्य महर्षींचे शिल्प

दक्षिण दिशेस प्रस्थान संपादन

देवतागणांच्या विनंतीस मान देऊन अगस्त्यांनी काशीग्राम सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर ते दक्षिणेतच स्थायिक झाले. आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते. जगप्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्ये रामायण तथा महाभारत ह्या दोहोंमध्ये महर्षीं अगस्त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांबद्दल विस्मयकारक आख्यायिका आढळतात. रामायणामध्ये त्रेतायुगात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळांत वनांत हिंडत असतांना नाशिकजवळ महर्षींच्या आश्रमात आले आणि त्यांना भेटले अशी एक कथा आहे. त्यावेळी महर्षींनी प्रभु रामचंद्रास ‘विरजा’ नामक शैवदीक्षा दिली, तसेच दक्षिणेत जाऊन लंकापती रावणाचा अत्याचार दूर करावयास सुचविले. एवढेच नव्हे तर लंकापतीस वश करून त्याचा अंत करण्याच्या हेतुपूर्तीसाठी अजोड, अमोघ शस्त्रास्त्रांसह कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता दिला. त्यांनीच भगवान प्रभु रामचंद्रास लंकागमनापूर्वी ‘आदित्यहृदयम्’ स्तोत्र उपदेशिले होते. त्यामुळे प्रभु रामचंद्राचा समरोत्साह दुणावला.

कावेरी नदीची जन्मकथा संपादन

अगस्त्य महर्षींनी उत्तरेकडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले तेंव्हा मार्गामध्ये ‘पोन्नि’ नामक एक पुरातन नदी त्यांसा आडवी आली. ती महर्षींच्यासह गर्वाने आणि अहंकाराने बोलत वादविवाद करू लागली. तेंव्हा कोपायमान होऊन महर्षींनी तिला स्वतःच्या मंत्रशक्तिबळाने एका कमंडलूमध्ये बद्ध केले. तसे केल्यानंतर महर्षी तपश्चर्येस बसले. तेंव्हा पोन्नि नदी कमंडलूच्या आतून सहाय्याकरता धावा करू लागली. हे पाहून भगवान श्रीगणेशाने एका कावळ्याचे रूप धारण केले. ज्या ठिकाणी महर्षी तपश्चर्या करत बसलेले होते, त्या ठिकाणी कावळ्याच्या रूपात भगवान श्रीगणेशाने उडत येऊन त्या कमंडलूस एक धक्का देऊन पाडले. त्यामुळे पोन्नि नदीची कमंडलूतून सुटका झाली आणि ती भूमिवर पुन्हा वाहू लागली. ते पाहून अगस्त्य महर्षींनी “कावळ्यामुळे वाहिलेली” अशा अर्थाचे नांव म्हणून त्या नदीचे नवे संस्कृत नामकरण “कावेरी” नदी असे केले. आज कावेरी नदी ही दक्षिणेत अगदी गंगेसमान धार्मिक महत्त्वाची मानली जाते.

समुद्रप्राशन, वातापि-इल्वलमर्दन तथा विंध्यपर्वताच्या कथा संपादन

महाभारतात भगवान अगस्त्यांनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देवासुरयुद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर महर्षींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले. याबरोबरच त्यांनी नहुषाच्या शापाने विषसर्पस्वरूप झालेल्या वातापि नामक महादैत्यास भक्षून आपल्या जठराग्नीने पचवून, त्याचा सहोदर इल्वल ह्यास नेत्राग्नीद्वारा भस्मीकृत केले अशीही कथा आहे. भगवान श्री अगस्त्य महर्षी हे विंध्य पर्वताचे गुरू असल्याचा उल्लेख महाभारतात अन्यत्र आहे. प्राचीन काळी मेरु पर्वत हा साऱ्या पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून मान्यताप्राप्त होता. ह्याची उत्तुंगशिखरे पाहून ईर्ष्येने विंध्य पर्वत स्वतःची उंची मेरु पर्वतापेक्षा अधिक करण्याकरिता वाढवू लागला. ह्यामुळे पृथ्वीच्या सूर्यगमनामध्ये बाधा येऊन काळगणनेमध्ये अंतर पडू लागले. उंचीने सतत वाढत असल्यामुळे विंध्यास गर्व झाला. तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना ‘काहीतरी करा परंतु ह्यातून सोडवा’ अशी प्रार्थना केली. महर्षी दक्षिण दिशेस गमन करीत असताना विंध्य पर्वत त्यांस आडवा आला. गुरुतुल्य महर्षींच्या अद्भुत सिद्धी मनोमन जाणून विंध्य पर्वत त्यांच्यापुढे नमला आणि महर्षींच्या दक्षिणदिग्विजयासाठी त्याने त्यांना मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर महर्षींनी त्यास स्वतः पुनः उत्तर दिशेस परतेस्तोवर जैसा आहे तैसा असण्याची आज्ञा केली. परंतु महर्षी दक्षिणेकडून न परतल्यामुळे विंध्य नेहमीसाठीच विनतावस्थेत राहिला आणि त्याकारणे आर्यावर्ताचा दक्षिणदेशाशी संपर्क स्थापन होऊ शकला.

विवाह संपादन

मनुस्मृतीच्या कथनानुसार साऱ्या हिंदुंप्रमाणे महर्षींनासुद्धा विवाह करून संततीजनन करण्याची वेळ प्राप्त झाली, तेव्हा धनकीर्तिप्राप्त विदर्भराज निमी ह्याची कन्या लोपामुद्रा ही युक्त वयास प्राप्त झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह करण्यासंबंधी विदर्भराजास विनंती केली. प्रथमत: एका विरागी मनुष्याकडून हे प्रतिपादन ऐकून विदर्भराज खिन्न झाला. परंतु भगवान श्री अगस्त्य महर्षींचे प्रतिभाशाली व्यक्तित्व देखून त्याने ह्या विवाहास मान्यता देऊन महर्षींचा लोपामुद्रेशी विवाह लावून दिला. पुढे ह्या दंपतींस दृढस्यु नावाचा पुत्र झाला. महर्षींच्या लोकोत्तर कार्यामध्ये त्यांची पत्नी लोपामुद्रा ह्यांनीदेखील स्वतंत्र बुद्धिमत्तेने साथ दिल्याचे पुराणांमध्ये आढळते.

ग्रंथनिर्मिती संपादन

तमिळ साहित्यामध्ये अनेक अगस्त्यांच्याबद्दल उल्लेख आढळत असला, तरी ज्यांस वैद्यशास्त्र तथा ज्योतिषशास्त्राचे आचार्य म्हणून आराधिले जाते, ते कुंभोद्भवन् ह्याही नांवाने प्रख्यात असलेले भगवान श्री अगस्त्य महर्षीच होत. दाक्षिणात्य सिद्ध औषध चिकित्सापद्धतीचे जनक म्हणून देखील ते मान्यताप्राप्त आहेत. आयुर्वेदीय औषधांवर अभ्यास करून ‘अगस्त्यरसायनम्’ नामक ग्रंथही त्यांनी लिहिला. विश्वकर्म्याने त्याचा ग्रंथ ज्या ग्रंथावर आधारल्याचे मानले जाते तो ‘अगस्त्यकलाधिकारम्’ हा महर्षींनी स्थापत्यशास्त्रावर लिहिलेला ग्रंथ प्रचलित आहे. त्यासह नौकाशास्त्राची उत्पत्ती करवून पहिल्यावहिल्या होडीचा शोध महर्षींनी लावला असे मानले जाते. त्यांनी देशोदेशी भ्रमण करून अनेक नवीन प्रांत शोधून काढले. त्यांनी संस्कृतमध्ये रचलेले ‘रत्नशास्त्रम्’ देखील उपलब्ध आहे, ज्यात रत्नाची उत्पत्ती तथा लक्षण, गुण आणि परीक्षा करण्याच्या विधिविधानांचे वर्णन आहे. त्यांनी रचलेल्या ‘अगस्त्यसंहिता’ नामक ग्रंथांत विष्णुपूजन करावयाची रीति दर्शावणारे शास्त्र आहे. त्यांनीच ‘श्रीललितासहस्रकम्’ स्तोत्राची रचनाही केली. १२,००० सूत्रे समाविष्ट असलेला ‘अगस्त्यम्’ हा विश्रुत ग्रंथ महर्षींनी रचला. वराहपुराणातील ‘अगस्त्यगीत’, पत्र्चरात्रम्‌ तथा स्कन्दपुराणातील ‘अगस्त्यसंहिता’ पासून विविध पुराणांच्या भागांमध्ये महर्षींच्या कर्तृत्वाचा उल्लेख असल्याचे दिसते. महर्षींनी एकूण ९६ ग्रंथांची निर्मिती केल्याचे मानले जाते. यातील अनेक ग्रंथ प्रस्तुत काळीं अपूर्ण स्थितीमध्ये का होईना, उपलब्ध आहेत.

जीवनकार्य संपादन

महाभारतातील शांतिपर्वात त्यांनी गायलेली विद्या ‘अगस्त्यगीता’ नामे ओळखली जाते. केरळ प्रांताच्या ‘कलरीपायट्टु’ (मार्शलआर्ट)ची ‘वर्मक्कलै’ म्हणून ओळखली जाणारी निःशस्त्र युद्धकलेची एक दाक्षिणात्य शैली आहे. ह्या ‘वर्मक्कलै’चे संस्थापक आचार्य तथा आदिगुरू भगवान श्री अगस्त्य महर्षीच असल्याचे मानले जाते. ह्या विषयावर त्यांनी तमिळभाषेत ग्रंथलेखनही केले. महर्षी तंत्रशास्त्राचार्य तर होतेच त्यातही त्याकाळी साधारणपणे अप्राप्य मानल्या जाणाऱ्या आकाशभ्रमणाचेही ज्ञान त्यांना होते. युद्धशास्त्रात तथा तत्कालीन आधुनिक धनुर्विद्येत देखील ते पारंगत होते. ते नेहमी धनुष्यबाण सोबत बाळगत. दुर्गम भागात उपलब्ध होणाऱ्या धातूंच्या रासायनिक मिश्रणाचे प्रयोग करून सिद्ध केलेली अस्त्रे ही सुयोग्य योद्ध्याच्या हाती सोपवण्याचे कार्य महर्षींनी जीवितकार्य मानून अंगीकारल्याचे दिसून येते. त्यांच्या उदाहरणावरून, त्यांच्यासारखा एक महर्षी युद्धकाळांत उपयोगी पडणारी शस्त्रास्त्रे बनवणारादेखील असू शकतो असे लक्षांत आल्यावाचून राहत नाही. विंध्यपर्वत पार करून दक्षिणेमध्ये येतांना तसेच दंडकारण्यामध्ये निवास करतांना निसर्गदत्त धातूंच्या खाणींवर कोणाचा अधिकार असावा हा विषय ते लक्षांत घेतात. भूसर्वेक्षण, जलसर्वेक्षण तथा दक्षिणेतील कावेरी, ताम्रपर्णी ह्या नद्यांच्या पाण्याचे तत्काळीन समाजासाठी त्यांनी केलेले उपयोगी व्यवस्थापन आदि घटना त्यांच्या अथांग कर्तृत्वाची साक्षच देतात. एकूणच त्यांचे सारे जीवन हे विविध विद्या ग्रहण करून त्यांचा आध्यात्मिक अंगाने अभ्यास करत, तत्काळी उपलब्ध भौतिक साधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहिलेले असल्याचे दिसते.

तमिळ भाषेचे जनक संपादन

भगवान श्री अगस्त्य महर्षी ह्यांनीच तमिळभाषेची अक्षरमाला निर्मिली. ह्याकारणे ते तमिळ भाषेचे जनक मानले जातात. त्यासह ते तमिळ भाषेचे आद्य वैयाकरणीही होत असा विश्वास आहे. प्रसिद्ध तमिळ व्याकरणपर ग्रंथ ‘तोल्‍क्काप्पियम्’ ज्यांनी रचले, ते ‘तोल्‍क्काप्यर मुनी’ हे महर्षींचेच प्रथमशिष्य होत. संस्कृतभाषेच्या तोडीस तोड ज्ञानभाषा म्हणून तमिळभाषेला मान्यता प्राप्त होण्यात महर्षींनी स्वतः पुढाकार घेऊन तमिळभाषेत निर्मिलेली विपुल ग्रंथसंपदा ही मुख्यत: कारणीभूत ठरावी. दक्षिणेकडे निसर्गतःच भरपूर प्रमाणांत उपलब्ध असलेल्या ताडाच्या झाडांच्या पत्रांची उपयुक्तता जाणून, त्यांवर कोरून लेखन करण्याच्या कलेचा शोध त्यांनी ज्ञानविद्या दीर्घकाळ टिकण्याच्याच उद्देशाने लावला. दूरदृष्टीने ताडपत्रांच्या केलेल्या ह्या उपयोजनाचा प्रभाव शतकानुशतके टिकून राहिला असून पुरातन काळांतील अशी अनेक हस्तलिखिते आजही दक्षिण भारतांत आढळतात.

नाडीग्रंथशास्त्राची निर्मिती संपादन

उपरोल्लेखित अनेक सर्वगुणांसह महर्षी स्वतः एक उत्तम तत्त्ववेत्ता देखील होते. तत्त्वज्ञान आणि ज्योतिषशास्त्र ह्यांच्या सुरेख संगमातून त्यांनी नाडीग्रंथशास्त्राची निर्मिती केली. आध्यात्मिक योगशक्तिबळाने दूरच्या भविष्यकाळाचा वेध घेऊन त्या येणाऱ्या काळांतील मनुष्यप्राण्याचे जीवन सुसह्य व्हावे, आगामी समाजाने परब्रह्मस्वरूप कर्मविपाकसिद्धान्ताची कास सोडता कामा नये ह्यासाठी त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी नाडीग्रंथरचना केली. ह्या कार्यात त्यांच्यासारख्याच इतरही अनेक महर्षींनी हातभार लावला. ह्या साऱ्यांनी आपल्या आध्यात्मिक योगशक्तिबळाच्या साहाय्याने मानवी बुद्धीच्या मर्यादा ओलांडून आकाशस्थित ज्ञानभांडारातून आगामी काळांतील अनेकांची जीवनचित्रे न्याहाळून काव्यबद्ध स्वरूपात नोंदवून ठेवली. ईश्वरी प्रेरणेने त्यांचे जीवनकार्य घडतांना त्यांच्या आयुष्यातील छोटेमोठे प्रश्न सुटावेत ह्यासाठी वडीलकीच्या प्रेमळ नात्याने शांतिदीक्षेसारखे उपाय नाडीग्रंथलेखन करून सुचवले. ह्या साऱ्या विस्तृतकार्याचा आरंभ त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी केला.

विविध स्थळे संपादन

 
अकोले येथील अगस्ती ऋषींची मूर्ती

भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिळनाडू (चेन्‍नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपऱ्यात उगवणारा तारा कॅनोपस (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.

अगस्तीच्या जीवनकार्याचा वेध घेणारी मराठी पुस्तके संपादन

  • मांदार्य (कादंबरी; लेखक - राजेंद्र खेर)
  • अगस्त्य (कादंबरी, लेखक- डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे)

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

http://www.gokarnamahabaleshwar.com/sthalmahatmya/sthal_agasti.html[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती